स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे झारखंडहून
नदीपात्रात वेगाने वाढून जलप्रवाहाला अडथळा निर्माण करणारी आणि पर्यावरणासाठी डोकेदुखी ठरणारी जलपर्णी आता रोजगाराचे साधन ठरत आहे. या टाकाऊ वनस्पतीपासून धागा तयार करून त्याद्वारे आकर्षक साड्या विणण्याचा अभिनव प्रयोग झारखंडमधील जमशेदपूर येथील पर्यावरण अभ्यासक आणि माजी अभियंता गौरव आनंद यांनी यशस्वी केला आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा उपक्रम शाश्वत फॅशनच्या क्षेत्रात नवी दिशा दाखवणारा ठरत आहे.
गौरव आनंद यांनी टाटा स्टीलमधील १६ वर्षांच्या नोकरीनंतर पर्यावरण संवर्धनासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जमशेदपूर येथे ‘स्वच्छता पुकारे फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून नदी आणि तलावांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान जलस्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या जलपर्णीची गंभीर समस्या त्यांच्या लक्षात आली. या समस्येवर उपाय शोधताना त्यांनी जलपर्णीचा उपयोग विविध उपयुक्त वस्तू तयार करण्यासाठी करण्याचे प्रयोग सुरू केले.
जलपर्णीपासून विद्युत दिवे, भित्तिचित्रे, टाइल आर्ट आणि चटया यांसारख्या वस्तू तयार करण्याचे प्रयोग करण्यात आले. त्यानंतर संशोधनातून या वनस्पतीच्या खोडातील तंतू वेगळे करून त्यापासून धागा तयार करण्याचे तंत्र विकसित करण्यात आले. जलपर्णी वाळवून, त्यावर आवश्यक प्रक्रिया करून मिळवलेल्या तंतूंचा वापर कापसासोबत करून साड्या विणण्याचा प्रयोग यशस्वी झाला. या धाग्यांपासून तयार होणाऱ्या साड्यांना आकर्षक रंग आणि विविधरंगी स्वरूप देण्यात येते.
पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बोनगाव आणि मच्छलंदापूर परिसरातील ३० तलावांमधून जलपर्णी गोळा करून हा प्रयोग राबविण्यात आला. स्थानिक महिलांच्या सहभागातून पारंपरिक टँट साड्यांमध्ये जलपर्णीपासून तयार केलेल्या धाग्याचा वापर करण्यात आला. या प्रयोगात सुमारे दोनशे महिलांनी सहभाग घेतला. जलपर्णी संकलनापासून तिच्यावर प्रक्रिया करण्यापर्यंतच्या कामातून महिलांसाठी उत्पन्नाचे नवे साधन निर्माण झाले.
या उपक्रमामुळे जलस्रोतांमधील जलपर्णी कमी करण्यास मदत होण्याबरोबरच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळू शकते. या साड्यांना देशांतर्गत बाजारपेठेसह फ्रान्स आणि इटलीसारख्या देशांतही मागणी असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुरुवातीला एक हजार साड्या तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
पर्यावरण संवर्धन, टाकाऊ संसाधनांचा पुनर्वापर आणि महिला आर्थिक सक्षमीकरण यांचा सुंदर संगम साधणारा गौरव आनंद यांचा हा प्रयोग भविष्यात शाश्वत वस्त्रोद्योगासाठी प्रेरणादायी ठरू शकतो.





