स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे वरखेडहून
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील वरखेड येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेने शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने’अंतर्गत शाळेत अत्याधुनिक संगणक कक्ष, रोबोटिक्स लॅब आणि नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. डिजिटल सुविधांमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.
शाळेत संगणक आणि रोबोटिक्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाते. प्रत्येक वर्गखोलीत इंटरनेट, वाय-फाय आणि प्रोजेक्टरसह इंटरॲक्टिव्ह बोर्डची सुविधा उपलब्ध आहे. बालस्नेही वर्गखोल्या, खुले विज्ञान केंद्र आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओ वॉटर फिल्टर प्लांट यांसारख्या सुविधांमुळे शाळेचे स्वरूप अधिक आधुनिक झाले आहे.
शुभम बुरुकुल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना संगणक आणि रोबोटिक्सचे धडे दिले जातात. उर्मिला शेळके विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिशचे प्रशिक्षण देतात. त्यामुळे तंत्रज्ञानासोबतच भाषिक कौशल्यांच्या विकासावरही भर दिला जात आहे.
शाळेत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि एनएमएमएससारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन केले जाते. शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये आठवीच्या सात विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत यश मिळवले, तर एका विद्यार्थिनीने राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. मागील दोन शैक्षणिक वर्षांत दोन विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
अभ्यासासोबतच शाळेत खो-खो, कबड्डी, रिले, बॅडमिंटन, लांब उडी, उंच उडी आणि इतर क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांनी जिल्हा व विभागीय स्तरावरही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय निर्माण करण्यासाठी शाळेत विद्यार्थी बचत बँक चालवली जाते. शालेय परसबागेतील भाजीपाल्याचा वापर मध्यान्ह भोजनासाठी केला जातो.
२३ गावांतील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र
वरखेडच्या या शाळेत परिसरातील २३ गावांमधील सुमारे ४६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापक शरद बंगाळे, शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. आधुनिक तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि विविध कौशल्यांच्या विकासावर भर देत ही शाळा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे.





