स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे केरळहून
कार चालवताना क्लच दाबण्याची किंवा गिअर बदलण्याची गरजच पडली नाही, तर किती छान होईल ना? केरळमधील अकरावीच्या दोन विद्यार्थ्यांनी अशीच एक अनोखी मिनी कार तयार केली आहे. या कारमुळे वाहन चालवणे अधिक सोपे होऊ शकते.
कोट्टापुरम येथील सेंट अॅनीज हायर सेकंडरी स्कूलमधील व्ही. जे. जोसबिन आणि उमा शिवानी या दोन विद्यार्थ्यांनी ‘इको राइड’ नावाची दोन आसनी मिनी कार तयार केली आहे. या कारमध्ये क्लच आणि गिअर बदलण्याची कटकट नाही. त्यामुळे नवीन चालकांना तसेच दिव्यांग व्यक्तींना कार चालवणे सोपे व्हावे, हा या विद्यार्थ्यांचा मुख्य उद्देश आहे.
पेट्रोलवर चालणारी ही छोटी कार अरुंद ग्रामीण रस्त्यांवरही सहज चालवता येऊ शकते. या कारमध्ये दोन व्यक्तींना बसण्याची सोय आहे. विशेष म्हणजे, या कारच्या निर्मितीचा खर्चही साधारणपणे स्कूटरच्या खर्चाइतकाच असल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या अभिनव कारला विज्ञान मेळाव्यातही विशेष मान्यता मिळाली आहे.
कोडुंगल्लूर उपजिल्हा विज्ञान मेळाव्यात सामाजिक शास्त्रांच्या कार्यरत प्रतिकृती या विभागात ‘इको राइड’ने ‘ए’ श्रेणी मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही युवा संशोधकांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी एक नवा मार्ग दाखवून दिला आहे.
योग्य विचार, मेहनत आणि काहीतरी वेगळे करण्याची जिद्द असेल, तर लहान वयातही नावीन्यपूर्ण संशोधन करता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. ‘इको राइड’ ही मिनी कार केवळ एक अभिनव कल्पना नसून, भविष्यात वाहन चालवणे अधिक सुलभ करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.






