स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून
फ्रान्समधील बोर्डो येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड (EGMO) २०२६ स्पर्धेत मुंबईच्या १६ वर्षीय श्रेया शांतनू मुंदडा हिने अभूतपूर्व कामगिरी करत भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय विद्यार्थिनी ठरली आहे.
श्रेया हिने ४२ पैकी तब्बल ३५ गुण मिळवत आपल्या विलक्षण गणिती प्रतिभेची आणि अथक मेहनतीची छाप उमटवली. जगभरातील ६७ देशांतील २६० हून अधिक विद्यार्थिनींच्या सहभागामुळे ही स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते.यात ६७ सहभागी देशांमध्ये भारताने सहावे स्थान मिळवले.
श्रेया हिने ही कामगिरी शाळेत न जाता घरूनच अभ्यास करून केली आहे. श्रेयाचे वडील शांतनू मुंदडा कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत होते तर आई रेखा ऑरगॅनिक केमिस्ट्रीच्या प्राध्यापिका आहेत.
मुंबईत वास्तव करीत असताना श्रेयाच्या पालकांना लक्षात आलं की मुंबई ही आरोग्यासाठी अपायकारक आहे. तसेच मुलेही पर्यावरणापासून दूर होत आहेत. म्हणून त्यांनी आपल्या उपजीविकेसाठी मध्यप्रदेशातील एका गावात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गावात जाऊन 2 एकर जमीन देखील खरेदी केली व त्यांनी तेथे जैविक शेती करण्यास सुरुवात केली.
त्यांनी मुलांसाठी देखील हीच क्लासरूम निवडली. हळूहळू मुलांना पर्यावरणात, शेतीत आणि अभ्यासातही गोडी निर्माण झाली. श्रेयलाही याच दरम्यान मॅथसची जिज्ञासा निर्माण झाली तिची जिज्ञासा लक्षात घेऊन तिच्या पालकांनी तिला रेजिंग मॅथेमॅटीशन फाउंडेशन शी जोडले. तेथेच श्रेयाने मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड तयारी केली.आणि मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड 2026 चे सुवर्णपदक पटकाविले.
श्रेया हिच्या या ऐतिहासिक यशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विशेष दखल घेत तिचे कौतुक केले. १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी श्रेयाच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला. तसेच ‘मन की बात’ कार्यक्रमातही तिच्या यशाचा उल्लेख करून तिच्या गणिती प्रतिभेचे कौतुक केले.
पंतप्रधानांकडून झालेल्या या गौरवामुळे श्रेयाच्या यशाला राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
तिच्या कामगिरीमुळे गणित आणि STEM क्षेत्रात पुढे जाण्याची स्वप्ने पाहणाऱ्या देशभरातील असंख्य विद्यार्थिनींना नवी प्रेरणा मिळाली आहे.






