- जीवनसंघर्षाच्या कहाण्या ऐकून सर्वांनाच लढण्याची प्रेरणा
- मुरलीकांत पेठकर, डाॅ. अरुण दातार, डाॅ. आरती दातार, सुरेश पाटील, सोनाली पाटील यांच्याशी संवाद
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून.
आपल्या जीवनात कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी हारून जायचे नाही आणि प्रतिकूलतेवर मात करीत यशस्वी होऊन दाखवायचे, असा संदेश आज युवा परिषदेत उपस्थित संघर्षयात्रींनी दिला. त्यांची अफाट जीवनसंघर्षाची वाटचाल ऐकून सगळ्यांनाच आयुष्यात लढण्याची प्रेरणा मिळाली.
राज्यस्तरीय परिवर्तन युवा परिषदेमध्ये १९६५ सालच्या युद्धामध्ये शरीरात ९ गोळ्या घुसल्यानंतरदेखील जीवंत राहिलेले आणि भारताला पॅराआॅलंपिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे अफलातून व्यक्तिमत्त्व मुरलीकांत पेठकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डाॅ. अरुण दातार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डाॅ. आरती दातार, संघर्षयात्री सुरेश पाटील व सोनाली पाटील हे रियल हिरो उपस्थित होते. प्रतिक टिपणीस, अक्षय उंद्रे आणि यशपाल जवळगे यांनी या सर्व संघर्षयात्रींशी संवाद साधला.
मुरलीकांत पेठकर म्हणाले, माझे अवघे आयुष्यच संघर्षांनी भरलेले आहे. त्यामुळेच माझ्या कहाणीवर चंदू चँपियन हा चित्रपटदेखील साकारला आहे. त्यामुळे परिस्थितीपुढे हारून जाऊ नका. लढायला शिका. माझे अवघे आयुष्य तुम्हाला हेच सांगेल.
डाॅ. अरुण दातार म्हणाले, १९७३ साली एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला होतो. त्यावेळी रत्नागिरीला मोटरसायकलवरून जात असताना एसटी अंगावर आली. मोटरसायकलला धक्का लागून एसटीची दोन चाके पायावरून गेली. सात-आठ महिने शरीर प्लॅस्टरमध्ये राहिलो. जमिनीवर पाय टेकण्यासाठी दोन वर्षे लागली. पुढे मी स्वतःची जिम सुरू केली. पुण्यातील, राज्यातील महत्त्वाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत माझ्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. महेश हगवणे यांने तर विश्वश्रीचा मान मिळवला. भारतातील पहिली महिला शरीरसौष्ठवपटू घडवण्याचे भाग्य मला मिळाले.
डाॅ. आरती दातार म्हणाल्या, परिवर्तनमुळे खरे तर तुमच्याशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळाली. सहजीवनाला नुकती सुरुवात झालेली होती. लग्न होऊन जेमतेम एक वर्ष झालेले होते. आपल्या पतीला अपघात होतो त्यावेळी मला बळ मिळाले ते मी खेळाडू होते म्हणून. त्यामुळे तना-मनाचे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. आई वडिलांचे संस्कार आणि सहजीवन पाहिलेले होते त्यामुळे मला त्यातून शिकायला मिळाले. संस्कारसंपन्न असणे ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. नकारात्मक विषयावर बोलायचे नाही हे आई-वडिलांनी सांगून ठेवले होते. ११ तासांची शस्त्रक्रिया सुरू असतानाही मनात सकारात्मक विचार ठेवले. दोन वर्षांनी जेव्हा पाय लागले तेव्हा तो खरा आनंदाचा क्षण होता. ते दुःख उगाळत बसण्यापेक्षा पुढे आम्ही पुढच्या सहजीवनाचा आनंद घेतला. जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द, आशावाद, श्रद्धा या बळावरच ते पुन्हा बोनस आयुष्यासाठी उभे राहिले. हे आयुष्य समाजासाठी सत्कारणी लावायचे हे तेव्हापासूनच ठरवले. ज्या व्यायामाने वाचवले त्या व्यायामाचे संस्कार समाजावर करायचे म्हणून गेली ४५ वर्षे सूर्या जिम तळपत राहिली आहे. विद्यार्थी ही आमची संपत्ती आहे. आई, वडील व गुरू यांच्यापासून आपण लांब जातोय का याचा युवकांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. मोठ्यांवरची श्रद्धा डळमळीत होणे चांगले नाही. गुरू शिष्य परंपरा पुन्हा निर्माण होणे आवश्यक आहे. युवकांनी भरपूर वाचायला हवे. वाचनाची सोबत असेल तर काहीही कमी पडत नाही.
बत्तीसशिराळ्यातील एका गावातून आलेला संघर्षयात्री सुरेश पाटील म्हणाला, मला लहानपणापासून अपंगत्व आले. डाॅक्टरांच्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे पाय पूर्णतः निकामी झाला. सुरुवातीला काठीचा आधार घेऊन चालू लागलो नंतर काठीही टाकून दिली. पाचवीनंतर पुढची शाळा पाच किलोमीटर अंतरावर होती. अनेकदा शाळेत चालत जावे लागायचे. मित्रांनी या काळात खूप साथ दिली त्यांच्यामुळेच मी आज इथे आहे. मित्रांशिवाय जीवनात काही नाही अशीच माझी भावना आहे. आपल्याला जे जीवन मिळाले आहे त्यातून आपण पुढे जाऊन त्याचा आनंद घेत जगायला पाहिजे. लग्न झाल्यानंतर आम्ही धरणाच्या जवळ एक स्नॅक्स सेंटर सुरू केले. आता आमच्या पायावर आम्ही उभे आहोत. दिवसाला हजार रुपये आम्ही कमवतो आहोत. व्यवसाय कुठलाच कमी नसतो. फक्त संधी आणि लोकांची गरज शोधता आली पाहिजे. आता सामाजिक विषयांवर आधारित व्हिडिओ बनवण्याचा माझा विचार आहे.
सोनाली पाटील आपल्या आयुष्याची कहाणी सांगताना म्हणाली, लहानपणापासून वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत बाहेरचं जगच पाहिलेलं नव्हतं. माझ्या आजीने खूप पाठबळ दिले. तिने मला माझ्या पायावर उभे केले.