स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी तेलंगणातून
नयना जयस्वाल या तरुणीने वयाच्या २२ व्या वर्षी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी नयनाने पीएचडी चा अभ्यास सुरू केला होता.महिला सक्षमीकरणासाठी मायक्रो फायनान्सचे योगदान किती आहे या विषयात तिने पीएच.डी. पूर्ण केली आहे.
तेलंगणातील मेहबूब नगरमधील रहिवासी असलेली नयना लहानपणापासूनच हुशार आहे. वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी नयना शालेय शिक्षणातील महत्वाचा टप्पा असणारी दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाली आहे. तर वयाच्या 10 व्या वर्षी तिने इंटरमिजीएटचे शिक्षण पूर्ण केले.
वयाच्या 13 व्या वर्षी तिने पत्रकारिता व जनसंवादाची पदवी मिळवली आहे. त्यानंतर वयाच्या 15 व्या वर्षी नयनाने उस्मानिया विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. आशियातील सर्वात तरुण पदव्युत्तर पदवीधर असण्याचा विक्रम तिने रचला आहे.
नयना केवळ अभ्यासातच नाही तर खेळातही निपुण आहे. नयना ही आंतरराष्ट्रीय दर्जाची टेनिसपटू आहे. टेबल टेनिस खेळात नयनाने राष्टीय व दक्षिण आशिया चॅम्पियनशिपचा किताब पटकावला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळामध्ये तिने अनेक सुवर्ण, रौप्य व कास्यपदके मिळवली आहेत. नयना ही एक आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्ताही आहे. तिने जगभरातील अनेक चर्चासत्रांमध्ये भाग घेतला आहे.
अखेर वयाचा आणि यशाचा दुरान्मयेही संबंध नसतो. यश आपण कुठल्याही वयात मिळवू शकतो हेच नयना जयस्वाल हिने सिद्ध केले आहे.
Great