स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे उत्तराखंडहून
उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील काफलीखान गावचे युवा नवोन्मेषक रवि टम्टा यांनी एक आसनी ‘फ्लाइंग व्हेईकल’ तयार करून त्याची यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे. ‘हपिडा स्कायनेक्स’ असे नाव असलेल्या या प्रोटोटाइपचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, रवि यांच्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रवि टम्टा यांना लहानपणापासूनच आकाशात उड्डाण करण्याचे स्वप्न होते. विशेष म्हणजे, वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी त्यांनी आपल्या गावात हेलिकॉप्टर तयार केले होते. २०१४ मध्ये तयार केलेल्या या हेलिकॉप्टरची उड्डाण चाचणी घेण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र, संभाव्य दुर्घटनेच्या परिस्थितीत जबाबदारी निश्चित करण्यास अडचण येऊ शकते, या कारणामुळे त्यांना परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे उड्डाणाचे स्वप्न त्यावेळी अधुरे राहिले.
मात्र, या अपयशाने रवि थांबले नाहीत. अनेक वर्षांच्या संशोधन, प्रयोग आणि मेहनतीनंतर त्यांनी ‘हपिडा स्कायनेक्स’ हे वैयक्तिक वापरासाठीचे फ्लाइंग व्हेईकल विकसित केले. सुमारे वर्षभराच्या अथक प्रयत्नांनंतर अल्मोड्यातील एका मैदानात या प्रोटोटाइपची यशस्वी चाचणी करण्यात आली. विशेष म्हणजे, रवि यांनी स्वतः या वाहनाचे उड्डाण करून दाखवले.
हपिडा स्कायनेक्स’च्या यशस्वी चाचणीनंतर आता या फ्लाइंग व्हेईकलची क्षमता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढवण्यावर रवि टम्टा काम करणार आहेत. भविष्यात हे वाहन सुमारे पाच तास सातत्याने उड्डाण करू शकेल, अशी क्षमता विकसित करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
याविषयी रवि टम्टा म्हणाले, ड्रोन तंत्रज्ञानात सुधारणा करून हे एक आसनी फ्लाइंग व्हेईकल विकसित करण्यात आले आहे. भविष्यात सुरक्षित आणि इलेक्ट्रिक पर्सनल फ्लाइंग व्हेईकल विकसित करून भारतात ‘पर्सनल स्काय मोबिलिटी’ची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे माझे उद्दिष्ट आहे. या दिशेने झालेली ही यशस्वी चाचणी महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.
रवि टम्टा यांच्या या यशाची दखल उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही घेतली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर रवि यांचे अभिनंदन करत “अल्मोड्याचे युवा नवोन्मेषक रवि टम्टा यांनी ड्रोन तंत्रज्ञानामध्ये नवोन्मेष करत हपिडा स्कायनेक्स प्रोटोटाइपची यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे. ही उपलब्धी आपल्या तरुणांमध्ये प्रतिभा, नवोन्मेष आणि वैज्ञानिक विचारसरणीची कमतरता नसल्याचे सिद्ध करते,” असे म्हटले आहे.
फ्लाइंग व्हेईकलसोबतच रवि टम्टा यांनी पर्यावरण संरक्षण आणि ग्रामीण रोजगाराच्या क्षेत्रातही विविध प्रयोग केले आहेत. त्यांनी चीडच्या वाळलेल्या पानांपासून ‘पाइनपीट’ तयार करणारी मशीन विकसित केली आहे. या उत्पादनाचा वापर रोपवाटिका, बागायती आणि मशरूम उत्पादनासाठी केला जातो. याशिवाय त्यातून बायो-पेलेट्स तयार करून ऊर्जा निर्मितीसाठी वापर करता येतो.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिला आणि तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होत असल्याचे सांगितले जाते. या मॉडेलची उत्तराखंडमधील दहा जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी केली जात आहे.
अल्मोड्यासारख्या छोट्या गावातून सुरू झालेला रवि टम्टा यांचा हा प्रवास आता संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहे. १२ वर्षांपूर्वी अपूर्ण राहिलेले हेलिकॉप्टर उड्डाणाचे स्वप्न ‘फ्लाइंग कार’च्या माध्यमातून पूर्ण केल्याने रवि यांच्या जिद्दीचे आणि नवोन्मेषी वृत्तीचे विशेष कौतुक होत आहे.





