स्वदेस न्यूज(प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे अमरावतीहून
रेल्वे स्थानक, बसस्थानक, रस्ते आणि अनाथालयांच्या परिसरात बेवारस अवस्थेत सापडलेल्या दिव्यांग, अंध, मूकबधिर आणि मतिमंद मुलांना केवळ आसरा न देता त्यांना स्वतःचे नाव, कुटुंब आणि स्वाभिमान देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या कार्याची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथे गेल्या अनेक दशकांपासून अनाथ आणि दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या शंकरबाबांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
वझ्झर येथे शंकरबाबांनी स्व. अंबादासपंत वैद्य अंध, अपंग, मतिमंद, बेवारस मुलांचे बालगृह उभे केले. येथे सध्या ९८ मुली आणि २५ मुले अशी एकूण १२३ मुले-मुली आश्रय घेत आहेत. राज्यातील विविध भागांत बेवारस अवस्थेत सापडलेल्या या मुलांचे पालकत्व स्वीकारून शंकरबाबांनी त्यांना ‘पापळकर’ हे आडनाव दिले. रक्ताचे नाते नसतानाही या मुलांसाठी ते पालकाची भूमिका निभावत आहेत.
शंकरबाबांच्या कार्याची खरी व्याप्ती केवळ संगोपनापुरती मर्यादित नाही. मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबन यावर त्यांनी भर दिला. सज्ञान झाल्यानंतर अनेक मुला-मुलींना रोजगाराच्या संधी मिळवून देत त्यांचे विवाह लावून दिले आणि त्यांचे संसार उभे केले. त्यामुळे आश्रमातून बाहेर पडणारी मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वाभिमानाने जगू लागली.
‘अनाथारण्य’ने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
मुलांच्या मदतीने शंकरबाबांनी आश्रम परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली. सातपुड्याच्या पायथ्याशी हजारो झाडांचे संगोपन करून सुमारे १५ हजार झाडांचे ‘अनाथारण्य’ फुलवण्यात आले. अनाथ मुलांच्या आयुष्याला आधार देतानाच निसर्गालाही आधार देण्याचा हा अनोखा प्रयोग ठरला.
‘अनाथांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र कायदा हवा’
देशातील बेवारस मुलांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी स्वतंत्र कायदा करण्याची शंकरबाबांनी मागणी केली आहे. दरवर्षी हजारो मुले वाऱ्यावर सोडली जातात आणि वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनेक मुले आधाराविना राहतात, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
“अनाथ मुलांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी कायदा झाला, तरच पद्मश्री मिळाल्याचा खरा आनंद होईल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अनाथ मुलांना आधार कार्ड, मतदान ओळखपत्र यांसारख्या मूलभूत ओळखी मिळण्यातही अडचणी येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पत्रकारिता करताना अनाथ आणि दिव्यांग मुलांच्या वेदना पाहून समाजसेवेचा मार्ग स्वीकारलेल्या शंकरबाबांनी वझ्झरमध्ये उभे केलेले हे काम आज पुनर्वसनाचा आदर्श ठरले आहे. १२३ मुलांना नाव देण्यापासून त्यांच्या संसाराची घडी बसवण्यापर्यंत आणि हजारो झाडांचे जंगल फुलवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे माणुसकीच्या सेवेची प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.





