स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे केरळहून
केरळ : प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना केरळमधील तीन तरुणांनी त्याला पर्याय शोधण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. अस्विन जे. टॉम, ॲलन आणि बॅसिल या मित्रांनी ‘बक्वा’ या स्टार्टअप उपक्रमाच्या माध्यमातून उसाच्या प्रक्रियेनंतर उरलेल्या वनस्पतीजन्य वेस्टेज आणि मक्याच्या स्टार्चपासून पर्यावरणपूरक पाण्याची बाटली तयार केली आहे. दिसायला आणि वापरायला सामान्य प्लास्टिकच्या बाटलीसारखी असलेली ही बाटली योग्य औद्योगिक कंपोस्टिंगच्या परिस्थितीत साधारण १५० ते १८० दिवसांत विघटित होण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
केरळमधील नद्या, जलाशय आणि बॅकवॉटर परिसरात मोठ्या प्रमाणावर जमा होणारा प्लास्टिक कचरा पाहून या तिन्ही मित्रांनी प्लास्टिकला पर्याय शोधण्याचा विचार केला. पेट्रोलियम-आधारित पारंपरिक प्लास्टिकऐवजी वनस्पतीजन्य कच्च्या मालाचा वापर करून उत्पादन तयार करण्याची संकल्पना त्यांनी पुढे नेली.
या बाटलीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या निर्मितीत वापरला जाणारा कच्चा माल. साखर उत्पादन प्रक्रियेनंतर उरलेल्या उसाच्या वेस्टेजमधून मिळणारा वनस्पतीजन्य घटक आणि मक्यापासून मिळणारा स्टार्च यांचा वापर करून जैव-आधारित पदार्थ तयार केला जातो. त्यापासून बाटली तयार केली जाते. त्यामुळे जीवाश्म इंधनावर आधारित कच्च्या मालाला पर्याय देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे बाटलीचा आकार आणि वापर सामान्य प्लास्टिकच्या बाटलीसारखाच ठेवण्यात आला आहे. मात्र तिचे पर्यावरणीय वैशिष्ट्य वापरानंतर दिसून येते. योग्य औद्योगिक कंपोस्टिंगच्या परिस्थितीत ही बाटली तुलनेने कमी कालावधीत विघटित होण्यासाठी तयार करण्यात आली आहे. बाटलीसोबत तिचे झाकण आणि लेबलही अधिक पर्यावरणपूरक करण्यावर भर देण्यात आला आहे. या उपक्रमाची व्यावसायिक बाजूही लक्षवेधी आहे.
बाजारातील सामान्य पाण्याच्या बाटल्यांशी स्पर्धा करता यावी, यासाठी एक लिटरच्या बाटलीची किंमत सुमारे ३० रुपये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच ‘फ्री वॉटर प्रोजेक्ट’च्या माध्यमातून जाहिरातींच्या मॉडेलचा वापर करून लोकांना मोफत पाणी उपलब्ध करून देण्याचा आणि त्याचवेळी प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
‘बक्वा’ हा उपक्रम केरळ स्टार्टअप मिशनअंतर्गत नोंदणीकृत असल्याची माहिती देण्यात आली आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान देशभरातील उत्पादकांपर्यंत पोहोचवण्याचा या तरुणांचा मानस आहे. कचऱ्यातून उपयुक्त कच्चा माल मिळवणे आणि त्यातून प्लास्टिकला पर्याय देणारे उत्पादन तयार करणे, या दुहेरी उद्देशामुळे ‘बक्वा’चा प्रयोग पर्यावरणपूरक उत्पादनांच्या क्षेत्रातील लक्षवेधी उपक्रम ठरत आहे.





