स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे कोलकात्याहून
गणित म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर अवघड आकडे, सूत्रं आणि समीकरणं उभी राहतात. मात्र याच गणिताच्या क्षेत्रात एका भारतीय महिला प्राध्यापिकेने अशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय संशोधनाचा गौरव झाला आहे. गेल्या सात दशकांपासून गणितज्ञांसमोर आव्हान बनून राहिलेल्या ‘झारिस्की कॅन्सलेशन प्रॉब्लेम’ या गणिती कोड्याच्या विशिष्ट स्वरूपावर महत्त्वपूर्ण संशोधन करणाऱ्या कोलकाता येथील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापिका नीना गुप्ता यांचा प्रतिष्ठित ‘टाईम 100 नेक्स्ट इंडिया 2026’ या यादीत समावेश करण्यात आला आहे.
प्रसिद्ध गणितज्ञ ऑस्कर झारिस्की यांनी १९४९ मध्ये बीजगणितीय भूमिती या गणिताच्या प्रगत शाखेत ‘झारिस्की कॅन्सलेशन प्रॉब्लेम’ मांडला होता. या समस्येमध्ये दोन गणितीय रचनांमध्ये एक अतिरिक्त मिती जोडल्यावर त्या एकसारख्या दिसत असतील, तर त्यांच्या मूळ रचनाही एकसारख्याच असतील का, असा मूलभूत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
जवळपास सात दशकांपासून गणितज्ञांसाठी आव्हान ठरलेल्या या समस्येवर नीना गुप्ता यांनी २०१४ मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी ‘पॉझिटिव्ह कॅरॅक्टरिस्टिक’ या विशिष्ट गणितीय परिस्थितीत प्रतिउदाहरण शोधून काढले. अतिरिक्त मिती जोडल्यानंतर दोन वेगवेगळ्या गणितीय रचना समान होऊ शकतात, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांच्या या संशोधनामुळे गणिताच्या क्षेत्रातील एका महत्त्वपूर्ण गृहितकाला नवे वळण मिळाले.
कोलकाता येथे जन्मलेल्या नीना गुप्ता यांनी बेथ्यून कॉलेजमधून गणित विषयात पदवी पूर्ण केली. त्यानंतर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमधून पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी मिळवली. सध्या त्या याच संस्थेत प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे संशोधनक्षेत्र कम्युटेटिव्ह अल्जेब्रा आणि अफाइन अल्जेब्रिक जिओमेट्री हे आहे.
त्यांच्या संशोधनाची दखल घेत त्यांना २०१९ मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, २०२१ मध्ये रामानुजन पुरस्कार, २०२२ मध्ये नारी शक्ती पुरस्कार आणि २०२४ मध्ये इन्फोसिस पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसेच २०२५ मध्ये प्रतिष्ठित एमी नोथर व्याख्यानासाठीही त्यांची निवड झाली होती.
आता ‘टाईम 100 नेक्स्ट इंडिया 2026’ या प्रतिष्ठित यादीत ‘हेल्थ अँड सायन्स इनोव्हेटर्स’ श्रेणीत त्यांचा समावेश झाला आहे. त्यांच्या संशोधनाची ही जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण पोचपावती मानली जात आहे. जिद्द, सातत्य आणि संशोधनाची आवड यांच्या जोरावर जागतिक गणितविश्वात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या नीना गुप्ता आज विज्ञान आणि गणित क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.





