स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे ठाण्याहून
रस्त्यावरील सिग्नलवर फुले विकून किंवा छोट्या-मोठ्या वस्तू विकून उदरनिर्वाह करणाऱ्या मुलांच्या हातात आता रोबोटिक्सचे साहित्य आले आहे. ज्या मुलांचे बालपण सिग्नलवर संघर्ष करत गेले, तीच मुले आता आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे गिरवत रोबोट तयार करू लागली आहेत. ठाण्यातील ‘समर्थ भारत व्यासपीठ’ या संस्थेच्या ‘सिग्नल शाळे’ने या मुलांना शिक्षणासोबतच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची नवी दारे खुली करून दिली आहेत.
ठाण्यातील तीन हात नाका उड्डाणपुलाखाली शिपिंग कंटेनरमध्ये ही अनोखी शाळा सुरू आहे. ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या या शाळेत भटक्या-विमुक्त आणि वंचित समाजातील मुलांना शिक्षण दिले जाते. संस्थेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे.
रस्त्यावर भीक मागणाऱ्या किंवा फुले आणि इतर वस्तू विकणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न येथे केला जात आहे. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणही दिले जाते. दर शनिवारी आणि रविवारी मुलांसाठी संगणक आणि रोबोटिक्सचे विशेष वर्ग आयोजित केले जातात. या वर्गांमधून मुलांना रोबोट कसे तयार करायचे, त्यांचे कार्य कसे चालते आणि तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, याचे प्रात्यक्षिकांसह शिक्षण दिले जाते.
या प्रशिक्षणातून इयत्ता आठवी आणि नववीतील विद्यार्थ्यांनी ‘सिग्नल स्टार्स रोबोटिक्स टीम’ तयार केली आहे. या विद्यार्थ्यांनी स्वतःचा रोबोट विकसित केला असून, त्याला वस्तू उचलणे, हाताळणे आणि हालचाल करणे शक्य आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांनी आपल्या रोबोटसह विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. या टीममधील चार विद्यार्थ्यांनी FTC आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत प्रतिष्ठेचा ‘जज अवॉर्ड’ पटकावला आहे. तसेच काही विद्यार्थ्यांनी आंतरराज्यीय स्पर्धेत यश मिळवून इस्रोला भेट देण्याची संधी मिळवली. सहा विद्यार्थ्यांची कझाकस्तान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स महोत्सवासाठीही निवड झाली आहे.
सिग्नलवर फुले विकणाऱ्या या मुलांच्या आयुष्यात शिक्षणामुळे मोठा बदल घडत आहे. हातात विक्रीसाठी फुलांच्या माळा घेण्याऐवजी रोबोट तयार करण्याची स्वप्ने पाहणारी ही मुले आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहेत. योग्य संधी, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास वंचित मुलांमधील प्रतिभाही जागतिक स्तरावर चमकू शकते, हे सिग्नल शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.





