• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

नेपाळच्या ‘आशेच्या पंखांना’ सलाम!

महापुराच्या रौद्ररूपात जीवाची पर्वा न करता कॅप्टन प्रिया अधिकारी यांचे धाडसी बचावकार्य

Admin by Admin
September 3, 2026
in Positive news
0
नेपाळच्या ‘आशेच्या पंखांना’ सलाम!
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

 

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे काठमांडूहून

नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. महापुराने उद्ध्वस्त झालेल्या भागात सर्वत्र चिखल, वाहून गेलेली घरे आणि मृत्यूचे थरकाप उडवणारे दृश्य दिसत असताना, आकाशातून मदतीचे हात पोहोचवण्याचे अत्यंत धोकादायक काम हेलिकॉप्टर पायलट्स करत आहेत. या बचावकार्यात नेपाळच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर कॅप्टन प्रिया अधिकारी यांनी आपल्या धाडसाची आणि कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. अवघ्या सहा दिवसांत त्यांनी १०० हून अधिक रेस्क्यू मिशन्स पूर्ण करत शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले.

रसुवा जिल्ह्यातील तिमुरे गावाला महापुराचा सर्वात जास्त फटका बसला आहे.त्यामुळे तिमुरे बचावकार्याचे केंद्र ठरले असून या भागात जवळपास २० हेलिकॉप्टर्स सातत्याने बचाव आणि मदतकार्य करत आहेत.

पहिल्या दोन दिवसांतच प्रिया अधिकारी आणि त्यांच्या पथकाने तिमुरे परिसरातून २०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले.
मात्र, हे काम अजिबात सोपे नाही. चिखलाचे जाड थर साचल्यामुळे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे जमिनीवर टेकवून इंजिन बंद करणे अनेक ठिकाणी शक्य होत नाही. त्यामुळे नागरिक हेलिकॉप्टरमध्ये चढेपर्यंत पायलट्सना सतत पॉवर सुरू ठेवावी लागते.

अरुंद जागेत पाच-सहा हेलिकॉप्टर्सचा समन्वय
तिमुरेतील लँडिंगची जागा अत्यंत अरुंद असल्याने एकाच वेळी पाच ते सहा हेलिकॉप्टर्सना तेथे उतरावे लागते. अशा परिस्थितीत क्षणाक्षणाला अपघाताचा धोका असतो. सर्व पायलट्समध्ये रेडिओवरून सातत्याने संपर्क ठेवून कोणत्या हेलिकॉप्टरने कधी उतरायचे आणि कुठून उड्डाण करायचे, याचा काटेकोर समन्वय साधला जातो.

याविषयी प्रिया अधिकारी यांनी सांगितले की, या मोहिमेत नागरिकांना हेलिकॉप्टरमध्ये बसवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुरक्षित लँडिंग करणे हे मोठे आव्हान आहे. सलग अनेक दिवसांच्या उड्डाणांमुळे पायलट्स प्रचंड थकले असले, तरी बचावकार्य थांबवण्याचा प्रश्नच नाही, असे त्या सांगतात.

तिमुरेवरून उड्डाण करताना पुराच्या पाण्यात वाहून गेलेले मृतदेह आणि पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला परिसर पाहावा लागतो. जलविद्युत प्रकल्प, घरे आणि अनेक मानवी वस्त्या पुराच्या तडाख्यात वाहून गेल्या आहेत. आपल्या संपूर्ण आयुष्यात एवढा मोठा विनाश पाहिला नसल्याचे प्रिया अधिकारी यांनी सांगितले.
हा अनुभव २०१५ च्या नेपाळ भूकंपापेक्षाही भयंकर असल्याचे त्या मानतात.

प्रिया अधिकारी यांचा पायलट होण्याचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. सुरुवातीला त्या वैद्यकीय शिक्षणासाठी भारतात आल्या होत्या; मात्र आईची प्रकृती बिघडल्याने त्यांना नेपाळला परतावे लागले. त्यानंतर काठमांडूमध्ये त्यांनी बुद्धा एअरलाइन्समध्ये केबिन क्रू म्हणून काम सुरू केले. याच काळात त्यांनी बीएससी आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.
एका पार्टीदरम्यान भावाच्या पायलट मित्राने त्यांना हेलिकॉप्टरची जॉय राइड दिली आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. त्यांनी कर्ज घेऊन फिलिपिन्समध्ये पायलट प्रशिक्षण घेतले. २०१७ मध्ये त्या पूर्णवेळ हेलिकॉप्टर पायलट बनल्या आणि नेपाळच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर कॅप्टन होण्याचा मान मिळवला.

उंच प्रदेशातील बचाव मोहिमांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या प्रिया अधिकारी यांनी २०१५ च्या भूकंपावेळीही सलग तीन महिने दररोज अनेक रेस्क्यू सॉर्टीज केल्या होत्या. हिमालयात जखमी गिर्यारोहकांना वाचवण्यापासून ते महापुरातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यापर्यंत त्यांचा प्रवास आज नेपाळमधील असंख्य नागरिकांसाठी धैर्य, सेवाभाव आणि आशेचे प्रतीक ठरला आहे.

Previous Post

४०० कैद्यांचे आयुष्य काष्ठकलेने घडवणारे अजय मंडावी

Next Post

‘स्टील भांडी बँके’तून प्लास्टिकला दणका!

Admin

Admin

Next Post
‘स्टील भांडी बँके’तून प्लास्टिकला दणका!

‘स्टील भांडी बँके’तून प्लास्टिकला दणका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.