स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे गडचिरोलीहून
शासकीय योजनेतून दिवसातून तीन वेळा जेवण मिळूनही विद्यार्थ्यांमध्ये कुपोषणाची समस्या कायम असल्याचे लक्षात आल्यानंतर गडचिरोलीतील आयएएस अधिकारी शुभम गुप्ता यांनी त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने तोडगा शोधला. एटापल्ली तालुक्यातील तोडसा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता तपासण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित यंत्रणा बसवण्यात आली. या प्रयोगामुळे केवळ जेवणाच्या गुणवत्तेवर नियंत्रण आले नाही, तर कुपोषित विद्यार्थ्यांची संख्या आठ महिन्यांत ६१ वरून थेट २० वर आली.
सहायक जिल्हाधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून काम करताना शुभम गुप्ता यांना आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये पोषणाची कमतरता जाणवली. तोडसा आश्रमशाळेतील २२२ विद्यार्थ्यांचे प्राथमिक BMI विश्लेषण केल्यानंतर त्यापैकी ६१ मुले कुपोषित असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण असे दिवसातून तीन वेळा अन्न दिले जात होते. शासनाकडून निधीही उपलब्ध होता. मग कुपोषणाचे मूळ कारण नेमके काय, हा प्रश्न प्रशासनासमोर होता.
यावर उपाय शोधताना गुप्ता यांचा ‘फीडिंग इंडिया’ या संस्थेशी संपर्क आला. त्यानंतर ‘उद्योग यंत्र’ या स्टार्टअपच्या सहकार्याने शाळेत AI-सक्षम यंत्र बसवण्यात आले. दररोज जेवणाच्या वेळी विद्यार्थी आपली थाळी यंत्रासमोरील कॅमेऱ्यापुढे ठेवतात. त्यानंतर AI प्रणाली अन्नाच्या प्रतिमा आणि सुमारे २,१०० डेटा पॉइंट्सच्या आधारे जेवणातील कॅलरीज, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, वजन, तापमान आणि अन्नाची गुणवत्ता यांचे विश्लेषण करते.
या तंत्रज्ञानामुळे जेवणातील अनेक त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या.
नियोजित मेन्यूप्रमाणे पाच पदार्थ देणे अपेक्षित असताना काही वेळा चारच पदार्थ दिले जात होते. डाळ पातळ असणे, अंड्यांचा दर्जा निकृष्ट असणे, फळे खराब किंवा अतिपिकलेली असणे, भाज्या जास्त शिजणे अथवा पोषणमूल्य कमी होणे यांसारख्या बाबीही नोंदवल्या गेल्या. त्यामुळे अन्न पुरवठादारांची जबाबदारी निश्चित करण्यास प्रशासनाला ठोस डेटा मिळाला.
या यंत्रणेत विद्यार्थ्यांच्या BMI च्या नोंदी ठेवण्याचीही सुविधा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पोषणस्थितीतील बदल सातत्याने तपासणे शक्य झाले. अन्नाचा दर्जा आणि मेन्यूचे पालन सुधारल्यानंतर विद्यार्थ्यांच्या BMI मध्येही सकारात्मक बदल दिसून आला. तोडसा आश्रमशाळेतील या प्रयोगाचे परिणाम अत्यंत सकारात्मक ठरल्यानंतर ही AI-आधारित प्रणाली इतर शासकीय आश्रमशाळांमध्येही राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या पोषणाचा अधिक प्रभावीपणे मागोवा घेण्यासाठी मोबाइल ॲप विकसित करण्याचे कामही सुरू आहे.
कुपोषणासारख्या गंभीर प्रश्नावर केवळ निधी आणि योजनांवर अवलंबून न राहता डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रशासनिक इच्छाशक्ती यांची सांगड घातल्यास तळागाळातील समस्या अधिक अचूकपणे ओळखून त्यावर परिणामकारक उपाय करता येतो, हे गडचिरोलीतील या प्रयोगाने दाखवून दिले आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठीचा हा ‘AI पॅटर्न’ देशातील इतर शासकीय शाळांसाठीही अनुकरणीय ठरण्याची शक्यता आहे.






