स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे मध्य प्रदेशहून
नदी अस्वच्छ आहे, प्रशासनाने काहीतरी करावे, अशी तक्रार करणारे अनेकजण असतात. मात्र, तक्रार न करता स्वतः नदीत उतरून ती स्वच्छ करण्याचा निर्धार करणारे फारच कमी. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील ब्यावरा येथील २१ वर्षीय सुरेंद्र सिंग चौधरी ऊर्फ ‘बिट्टू तबाही’ याने हेच करून दाखवले आहे. कोणतीही मोठी संस्था, यंत्रसामग्री किंवा सरकारी मदत सुरुवातीला नसतानाही त्याने एकट्याने अजणार नदीतील कचरा, प्लास्टिक, गाळ आणि जलपर्णी काढत नदी स्वच्छ करण्याची मोहीम उभी केली.
बिट्टूने २६ जानेवारी २०२६, प्रजासत्ताक दिनापासून या मोहिमेला सुरुवात केली. नदीची दयनीय अवस्था पाहून काहीतरी सामाजिक काम करण्याचा निर्धार त्याने केला आणि थेट नदीत उतरून कचरा काढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही मित्र त्याच्यासोबत होते; मात्र नंतर तो बहुतांश काम एकट्यानेच करू लागला. तासनतास नदीत उतरून कचरा बाहेर काढण्याचे काम त्याने सातत्याने सुरू ठेवले.
या मोहिमेसाठी बिट्टूने स्वतःच्या खिशातून सुमारे ३० हजार रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते.
स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्य आणि कचराकुंड्या खरेदी करण्याबरोबरच त्याने कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यापासून खत तयार करण्याचाही प्रयत्न केला. दूषित पाण्यात काम करताना त्याच्या हातांना संसर्ग झाला, तसेच सापांसह अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, या संकटांनी त्याचा निर्धार डळमळला नाही.
बिट्टूच्या नदी स्वच्छतेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या कामाची देशभरात चर्चा सुरू झाली. उद्योगपती आनंद महिंद्रा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यांनी त्याच्या कार्याचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी बिट्टूची भेट घेऊन त्याच्या पर्यावरणविषयक प्रयत्नांचे अभिनंदन केले.
विशेष म्हणजे, त्याच्या कामाची दखल नेदरलँड्सस्थित ‘द ओशन क्लीनअप’ या संस्थेचे सीईओ बोयान स्लाट यांनीही घेतली असून, त्याला नोकरीची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, ब्यावरा नगरपालिकेनेही त्याच्या प्रयत्नांना पाठबळ देत नदीतील कचरा उपसण्यासाठी यंत्रसामग्री आणि मदत उपलब्ध करून दिली आहे.
एका तरुणाच्या इच्छाशक्तीने सुरू झालेली ही मोहीम आता प्रशासन आणि समाजासाठीही प्रेरणादायी ठरत आहे. ‘बदलाची सुरुवात कुणीतरी करावी लागते’ हे बिट्टूने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.






