- साकारला ‘श्री ग्रंथ गणेशाचा’ देखावा
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…
गणेशोत्सवाचे औचित्य साधत पुण्यातील मराठी माध्यमातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी यंदा श्री ग्रंथ गणेशाचा देखावा साकारला असून कात्रण संग्रहाचे प्रदर्शन भरवले आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांनी बुद्धीची देवता असलेल्या गणरायासमोर उभे राहून वाचनाचा विधायक संकल्पही केला आहे.
सोमवार पेठेतील दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या ‘बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचनकक्षा’त ‘बुद्धी’ची देवता असलेल्या ‘श्री गणेशा’च्या पुस्तकांचे, विविध भावमुद्रा असलेल्या मूर्तींचे तसेच छायाचित्र व माहितींच्या कात्रण संग्रहाचे प्रदर्शन आयोजित केले. याप्रसंगी संदर्भ ग्रंथपाल व माहितीतज्ज्ञ प्रसाद भडसावळे यांच्या मार्गदर्शनात मुलांनी वाचनाचा संकल्प केला.
सजावटीत गणपती विषयक पुस्तके, मासिके, नियतकालिके यांच्या वापरासोबतच ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या वैयक्तिक संग्रहातील काही गणेश मूर्तींचाही समावेश प्रदर्शनात आहे. तसेच जेष्ठ गणेश छायाचित्रं संग्रहक आशा शिंदे यांच्या तसेच त्यांच्या मार्गदर्शनात मुलांनी तयार केलेल्या गणेश विषयक माहिती व चित्रांच्या कात्रणसंग्रहांचा समावेशही आहे.
या दरम्यानच विद्यार्थ्यांनी गणेशाच्या आरत्या, स्तोत्र, कविता तसेच सुभाषितांचे सादरीकरण केले.
या अनोख्या उपक्रमात शार्मिन मोहम्मद, समीक्षा घोडियाल, मंजिरी गायकवाड, दक्ष घोडके, अथर्व जोंजाळ, विक्रांत ढसाळ, आलेख विज्ञानी, जनार्दन गायकवाड, फरिद कौलंगी, विष्णू दुभळकर, श्रिया जगताप हे विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले.
यावेळी मुख्याध्यापिका दीपमाला धायगुडे, प्रसाद भडसावळे, हरेश पैठणकर, केशव तळेकर, उत्तम साळवे आदी उपस्थित होतै.
‘ग्रंथ गणेश’ प्रदर्शनाबाबत बोलताना भडसावळे म्हणाले, ‘सार्वजनिक उत्सव, सण, समारंभाचे निमित्ताने ग्रंथालयाच्या माध्यमातून मुलांना पुन्हा वाचनास उद्युक्त करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यास विद्यार्थ्यांचाही सकारात्मक प्रतिसाद असतो.
हे प्रदर्शन दिनांक १४ सप्टेंबर पर्यंत सकाळी ८ ते १ यावेळेत आबासाहेब अत्रे दिन प्रशाला, ३५२ सोमवार पेठ, नरपतगीर चौक, येथे सर्वांसाठी खुले आहे. तसेच या प्रदर्शनाची झलक lndira Atre Reading Room या युट्यूब चॅनलवर पाहू शकता.