- ३६ हजार फुटांवर झाला विमानात बिघाड, राखले प्रसंगावधान
स्वदेस न्यूज ः
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून
पुणे: जमिनीपासून तब्बल ३६ हजार फूट उंचीवर असणाऱ्या विमानामध्ये अचानक बिघाड झाला आणि सर्व प्रवाशांच्या हृदयाची धडधड अधिकच वाढली. आता आपण काही वाचणार नाही, अशीच अवस्था सर्वांची झाली ! पण त्यामध्ये पुण्याच्या सहवैमानिक असणाऱ्या मैत्रेयी शितोळे हिने अतिशय धीराने सर्व परिस्थिती हाताळली आणि विमानातील बिघाड दुरुस्त केला. हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्यानंतर धावपट्टीचा अंदाज लावून विमान सुरक्षितरीत्या उतरवलं. विमानातील तब्बल १४० प्रवाशांचा जीव तिने वाचवला. या पुणेकर मुलीचे जगभर कौतुक होत आहे.
एअर इंडियाचे एक विमान शुक्रवारी त्रिचीहून शारजाहला जात होते. तमिळनाडूच्या त्रिची एअरपोर्टवर नेहमीप्रमाणे गजबज होती. प्रवाशी ये-जा करत होते, पण अचानक विमानात बिघाड झाल्याचे समजताच सर्वत्र धावपळ सुरू झाली. एअर इंडियाचे ‘फ्लाइट आयएक्स ६१३’ या विमानात तब्बल ३६ हजार फूट उंचीवर बिघाड झाला होता. एक-दोन नव्हे तर तब्बल १४० प्रवाशांचा जीव त्यामुळे धोक्यात आला होता.
विमानातील हायड्रॉलिक सिस्टिममध्ये अचानक बिघाड झाला आणि ते निकामी झाले. त्यामुळे वैमानिकांना चांगलीच कसरत करावी लागली. हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्याचे समजल्यानंतर विमानतळावर आणखीनच गोंधळ उडाला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विमानतळावर इमर्जन्सीची घोषणा केली. तातडीने सुरक्षेसाठी विमानतळावर २०हून अधिक रूग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
एअर इंडिया फ्लाइटचे पायलट क्रोम रिफादली फहमी झैनाल आणि सहवैमानिक मैत्रेयी शितोळे यांच्यासाठी ही परिस्थिती अतिशय गंभीर होती. त्यांची कसोटी पाहणारी होती. त्या दोघांनी विमानाला सुरक्षित खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि अखेर धावपट्टीचा अंदाज लावून विमान सुरक्षितरीत्या उतरवलं. तेव्हा १४० विमान प्रवाशांचा जीवात जीव आला. यामध्ये पुण्याची सहवैमानिक मैत्रेयी शितोळे हिचे मोठे योगदान होते.
एअर नेव्हिगेशनमध्ये प्राविण्य
मैत्रेयी ही एअर इंडियामध्ये सहवैमानिक म्हणून गेल्या चार-पाच वर्षांपासून काम करते. मैत्रेयीने न्यूझीलंडमधील मेनलँड एव्हिएशन कॉलेज, ड्युनेडिन येथे वैमानिकचे प्रशिक्षण घेतले. तिथेच तिने व्यावसायिक पायलट म्हणून काम सुरू केले. त्यानंतर मात्र मैत्रेयीने भारतात येऊन नोव्हेंबर २०१९ पासून ग्राऊंड इन्स्ट्रक्टर म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. एअर नेव्हिगेशन, तांत्रिक, उड्डाणाच्या इथिकल गोष्टी यामध्ये मैत्रेयीने प्राविण्य मिळवले आहे. मैत्रेयीने वैमानिक होण्याआधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची फिजिक्समधील डिग्री संपादन केली आहे. मैत्रेयीने तणावाखाली काम करण्याचे खास प्रशिक्षण घेतले आहे. तसेच डेडलाइनच्या अगोदर काम करण्याचे कौशल्यदेखील तिने आत्मसात केलेले असून, प्रशासकीय आणि संगणकीय कामातही ती निपुण आहे.
नेमकं घडलं काय ?
विमानामध्ये हायड्रोलिक सिस्टिममध्ये बिघाड झालेला. यामुळे विमान संचलन करताना इतर यंत्रणेमध्ये बिघाड होऊ शकतो, तसेच अनेक अडचणी येऊ शकतात. म्हणून वैमानिकांनी विमान टेक आॅफ केल्यानंतर तिथेच लॅंडिंग केले. पण लॅन्डिंग करताना काही प्रोटोकाॅल असतात. विमान लॅंन्डिंग करताना त्यातील इंधन कमी झालेले असते. पण हे विमान इंधनाने पूर्ण लोडेड होते. त्यामुळे ते इंधन कमी केल्याशिवाय लॅंन्ड करता येत नव्हते. म्हणून विमानाने काही काळ घिरट्या मारून इंधन कमी केले. त्यानंतर लॅंन्डिंग करण्यात आले, अशी माहिती वैमानिक सेवा सल्लागार धैर्यशिल वंडेकर यांनी दिली.