सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मराठी गीतांचा अखंड जागर
चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स‘ मध्ये विक्रमी नोंद
१ हजार १२ मराठी गीतांचे सादरीकरण
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सलग मराठी गीते सादर करून मुंबईतील गिरगावमधील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलने एक अनोखा विक्रम केला आहे. त्यांनी तब्बल 1 हजार 12 मराठी गीते सलग सादर केली असून त्याची दखल इंडिया बुक आॅफ रेकाॅर्डस् ने घेतली आहे.
मुंबईतील गिरगावमधील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलने सकाळी ७ वाजून १ मिनिटांनी सूर्योदयापासून ते सायंकाळी ६ वाजून ४२ मिनिटे सूर्यास्तापर्यंत सलग १ हजार १२ मराठी गीते सादर केली. चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेतील शिशुवर्गापासून ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असे एकूण १ हजार १२ जण यात सहभागी झाले होते.
विविध काळातील मराठी चित्रपट व नाट्यगीते, अभंग, भावगीते, भक्तिगीते, लोकगीते आदी मराठी गीते सादर करण्यात आली. दोन महिन्यांपासून या कार्यक्रमाच्या दृष्टीने शाळेत जय्यत तयारी सुरू होती. मराठी गीतांचा सातत्याने सराव केला जात होता. तसेच या कार्यक्रमाची सलग तब्बल १२ तासांहून अधिक वेळ रंगीत तालीमही करण्यात आली, अशी माहिती शाळेतील शिक्षक नारायण गिते यांनी दिली. यावेळी हायस्कूलच्या मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका संचिता गावडे व पर्यवेक्षक संतोष मांजरेकर उपस्थित होते.
……….
नागरिकांना व्हॉट्सअॅपवर मिळणार 500 सेवा …महाराष्ट्र शासनाचा पुढाकार
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून…
महाराष्ट्र शासनाने जगातील सर्वात मोठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ‘मेटा’सोबत करार केला आहे. यामुळे शासनाच्या 500 सेवा आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे लोकांना कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. वरळी येथे ‘परिवहन भवन’ या नव्या इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,परिवहन विभाग आला तेव्हा एकनाथ शिंदे यांनी अनेक बदल केले. परिवहन विभाग ज्या कारणासाठी बदनाम झाला होता, तोच प्रकार त्यांनी रद्द केला. परिवहन विभागातील सर्व बदल्या ऑनलाइन स्वरूपात सुरु केल्या. त्यामुळे पारदर्शकता आली. ऑनलाइन पद्धत सुरु केली आणि भ्रष्टाचाराला बंद केले.
या नव्या सुविधेमुळे भ्रष्टाचारालाही आळा बसेल आणि लोकांना सर्व सुविधा क्लिकवर उपलब्ध होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
…….
शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट! नवीन यंत्र करणार कमाल
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) ः
आजची चांगली बातमी आहे नागपूरहून…
अलीकडे शेती हा तोट्याचा व्यवसाय असा सर्वांचा समज झाला आहे. त्यामुळे तरुण पिढीही या व्यवसायाकडे फारशी येताना दिसत नाही. परंतु आता शेतीच्या व्यवसायात मोठी क्रांती होणार आहे.विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने (व्हीएनआयटी) नवे संशोधन केले असून त्याच्या वापराने शेतीच्या व्यवसायात मोठी क्रांती होणार आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न ‘डबल’ करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. ही घोषणा सत्यात उतरेल, असा दावा व्हीएनआयटीचे प्रा. डाॅ. दिलीप पेशवे यांनी केला आहे.व्हीएनआयटी व देशातील इतर संशोधक संस्थांनी मिळून शेतकऱ्यांसाठी पेरणीपासून कापणी व मळणीपर्यंतची यंत्रे तयार केली आहेत. या यंत्राचा वापर केल्यास खर्च कमी होईल व शेतकऱ्यांचे उत्पन्न २५० टक्के वाढेल, असा विश्वास डाॅ. पेशवे यांनी व्यक्त केला आहे.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) येथे त्यांनी या यंत्राच्या उपयोगितेचे सादरीकरण केले. ही यंत्र विशेषत: अल्पभूधारक शेतकऱ्यांना गृहित धरूनच तयार केल्याचे त्यांनी सांगितले. एका एकरातील गव्हाच्या पेरणीपासून ते मळणीपर्यंत साधारणत: २० ते २२ हजाराचा खर्च येतो.समजा त्यांचा गहू ३० हजारात विकला तर केवळ ८ ते १० हजाराचे उत्पन्न होईल. मात्र व्हीएनआयटीच्या तंत्राने शेती केल्यास शेतकऱ्यांना पूर्ण कार्यासाठी केवळ ३५०० ते ४००० रुपये खर्च लागेल व २५,००० ते २६,००० नफा मिळेल, असा विश्वास डाॅ. पेशवे यांनी व्यक्त केला.