६४ देशांचे विद्यार्थी घेणार भाग
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून
२००६ मध्ये थायलंडमधील चियांग माई येथे सुरू झालेली ऑलिम्पियाड स्पर्धा जगभरातील माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण करत आहे. या वर्षी मुंबईमध्ये होणार्या या स्पर्धेमुळे देशातील तरुण पिढीला खगोलशास्त्रात करिअर करण्याची संधी तर मिळेलच, पण त्याचबरोबर भारताची वैज्ञानिक प्रतिमा जगासमोर अधिक उंचविण्यासाठी मदत होईल. या स्पर्धेत सहभागी होणारी मुलं-मुली हे उद्याचे मोठे खगोलशास्त्री बनतील. त्या अनुषंगानेही ही स्पर्धा महत्त्वाची भूमिका बजावेल.
१८ वी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा २१ ऑगस्ट २०२५ पर्यत मुंबई येथे होणार आहे. तब्बल एका दशकानंतर जागतिक दर्जाची ‘विज्ञान स्पर्धा’ पुन्हा मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत ६४ देशांमधून सुमारे ३०० विद्यार्थी सहभागी होणार आहे. यासाठी स्पर्धक आणि त्यांचे १४० मार्गदर्शक/शिक्षक मुंबईत दाखल झाले आहेत.
टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्पेâ आयोजित या स्पर्धेत पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय अणुऊर्जा विभागाचे पाठबळ आहे.जगभरातील वैज्ञानिक प्रतिभेचा हा उत्सव असून आंतरराष्ट्रीय स्तरावर वैज्ञानिक सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
या स्पर्धेचा उदघाटन सोहळा १२ ऑगस्ट रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. या सोहळ्याला भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय सूद प्रमुख पाहुणे म्हणून, तर आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेचे माजी उपाध्यक्ष प्रा. अजित केंभवी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा समारोप सोहळा २१ ऑगस्ट रोजी नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात पार पडेल.
या सोहळ्याला अंतराळ विभागाचे सचिव डॉ. व्ही. नारायणन आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख उपस्थित राहतील, तर डॉ. अनिल काकोडकर यांना देखील विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. खगोलशास्त्रामध्ये भारत जी प्रगती करत आहे, ती जगासमोर मांडण्याची ही एक सुवर्णसंधी आहे असे केंद्रीय अणुऊर्जा विभागाचे म्हणणे आहे.
स्पर्धेचे स्वरूप
ही स्पर्धा उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी असून, त्यांचे खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीमधील ज्ञान, विश्लेषण आणि निरीक्षण क्षमता तपासली जाईल. यात सैद्धांतिक परीक्षा, डेटा विश्लेषण, आकाश निरीक्षण आणि सांघिक स्पर्धा अशा चार मुख्य परीक्षा असतील. याचा उद्देश विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन, सहकार्य आणि संवादाचे महत्त्व शिकवणे आहे.
विद्यार्थ्यांचे फायदे
ही स्पर्धा विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्याची, तर्कशुद्ध विचार आणि विश्लेषण क्षमता वाढवते. पदक विजेत्यांना शिष्यवृत्ती, प्रवेश संधी आणि संशोधन इंटर्नशिप मिळतात. शिक्षकांना खगोलशास्त्र शिकवण्याचे आधुनिक तंत्रही शिकायला मिळते. हे आयोजन भारताला जागतिक वैज्ञानिक समुदायात अग्रगण्य बनवेल.