स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) : –
आजची चांगली बातमी आहे केरळहून
केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील मंजनीक्करा येथील 69 वर्षीय दिव्यांग एन.एस. राजप्पन यांना वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी पोलिओमुळे अर्धांगवायू झाला. तरीही हार न मानता ते गेल्या अनेक वर्षांपासून दररोज सकाळी एका छोट्या बोटीतून प्रसिद्ध वेंबनाड तलावात जाऊन प्लास्टिकचा कचरा आणि बाटल्या गोळा करत तलाव स्वच्छ करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल पंतप्रधान मोदी यांनी मन की बात मध्ये घेतली आहे.
राजप्पन यांचा कमरेखालील भाग पूर्णपणे पॅरॅलाईज्ड असल्यामुळे त्यांना चालता येत नाही. ते हातांच्या साहाय्याने रांगत बोटीत जातात आणि तलावाची साफसफाई करतात. गोळा केलेले प्लॅस्टिक, कचरा स्थानिक एजन्सीला विकून त्यांना प्रतिकिलो फक्त १२ रुपये मिळतात. मात्र हे काम पैशांसाठी नव्हे, तर निसर्गावरील प्रेमापोटी आणि तलाव स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने करत असल्याचे ते आवर्जून सांगतात. ते सांगतात, मी आयुष्यभर याच पाण्याच्या आसपास राहिलो आहे. माझ्यासाठी जे शक्य आहे, ते मी करत आहे.
त्यांच्या याच इच्छाशक्तीने ते आज पर्यावरण संवर्धनाच्या कार्यासाठी ओळखले जात आहेत. राजप्पन यांचे पूर्वीचे घर चांगल्या स्थितीत होते. पण दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरात सगळं उद्ध्वस्त झाले. पुराच्या वेळी ते एका मोठ्या बोटीत राहत असत. आज ते एका अर्धवट उद्ध्वस्त झालेल्या लहान घरात एकटेच राहतात. जवळच राहणारी त्यांची बहीण त्यांना जेवण पुरवते.
त्यांच्या या निःस्वार्थ कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी घेतली आहे. एखाद्या व्यक्तीला आपल्या देशाबद्दल प्रेम कसे उत्तम प्रकारे दाखवता येईल तर कदाचित या मार्गाने. प्रेम फक्त शब्दांत किंवा सोशल मीडियावर नव्हे, तर कृतीतून व्यक्त होते असे कौतुक अभिनेता रणदीप हुडा यांनी राजप्पन यांचे केले आहे. राजप्पन यांचे हे कार्य आपल्याला पर्यावरण स्वच्छतेचा आणि समाजसेवेचा मोठा संदेश देणारे आहे.





