तेजसपाठोपाठ अत्याधुनिक स्वदेशी लढाऊ विमाने बनवणार
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे नवी दिल्लीहून
भारताने संरक्षणसज्जतेमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘तेजस’ पाठोपाठ पाचव्या पिढीतील अत्याधुनिक मध्यम पल्ल्याच्या लढाऊ विमानांच्या (एएमसीए) निर्मिती प्रकल्पास संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मंजुरी दिली आहे. देशातील एअरोस्पेस औद्योगिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जातो. या प्रकल्पासाठी खासगी क्षेत्राचीही मदत घेण्यात येईल.
पाचव्या पिढीतील या लढाऊ विमानांचे डिझाईन देशातच बनविण्यात येणार असून त्याच्याही प्रामुख्याने तीन श्रेणी असतील. स्टेल्थ, तंत्रज्ञानावर आधारित, स्वनातीत आणि बहुआयामी अशी त्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे लढाऊ विमानांच्या निर्मितीमध्ये देश आत्मनिर्भर होण्यास मदत होईल. दरम्यान संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयानंतर संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये सहा टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले.
कंपन्यांना नियम सक्तीचे
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने चीनकडून पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर हवाई दलाच्या ताफ्यात रशिया किंवा अमेरिकेकडून अशाच प्रकारच्या विमानांचा भरणा केला जाऊ शकतो. अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी खासगी क्षेत्रातील कंपन्या स्वतंत्रपणे अथवा संयुक्तपणे निविदा भरू शकतात. मात्र देशातील कायदे आणि नियमांचे पालन करणे त्यांच्यासाठी सक्तीचे असेल.
देश आत्मनिर्भर करण्यावर भर
‘एएमसीए’ प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आल्यानंतर तंत्रज्ञानाच्या बाबतीत देश आत्मनिर्भर होऊ शकतो. देशांतर्गत कंपन्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची संधीही यामुळे मिळणार आहे. सध्या जगात अमेरिका, रशिया आणि चीन या देशांकडे पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने गेल्यावर्षी हा प्रकल्प राबविण्यास मंजुरी दिली होती. या प्रकल्पावर सुरुवातीच्या टप्प्यात १५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.