स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून
अॅसिड हल्ल्यात डोळे गमाविलेल्या कैफीनं बारावीच्या परीक्षेत 95.6% मिळविले असून ती सगळ्यांच्याच कौतुकास पात्र ठरलेली आहे.
कैफीला दिसत नाही, कारण ॲसिड हल्ल्यात तिचे डोळे गेले. चेहरा पूर्णपणे भाजला, पण तिचा निर्धार कायम आहे. आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तिचा प्रवास सुरू आहे.
कैफीने ‘इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाइंड’ मध्ये 12वीमध्ये 95.6% मार्क्स मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे. 10वीमध्येही कैफीने 95.2% मार्क्स मिळवत पहिला क्रमांक मिळवला होता. कैफीचे वडील पवन हरियाणा सचिवालयात शिपाई आहेत आणि आई सुमन गृहिणी आहे. दोघांनीही 5वी पर्यंत शिक्षण घेतले आहे.
17 वर्षांच्या कैफीवरं ती फक्त तीन वर्षांची असताना शेजाऱ्यांनी कौटुंबिक वादातून ॲसिड फेकले होते. या हल्ल्यात तिची दृष्टी कायमची गेली. कैफीवर अनेक वर्षे दिल्लीतील एम्समध्ये उपचार करण्यात आले. 2016 मध्ये तिने शाळेत प्रवेश घेतला. 2018 मध्ये तिचे आई-वडील चांगल्या शिक्षणासाठी तिला घेऊन चंदीगडला आले.
IAS होण्याचे स्वप्न
कैफीला ती 10 वर्षांची असताना दुसरीतून थेट सहावीमध्ये प्रवेश मिळाला होता. कैफीने सांगितले की सुरुवातीला सहावीचा अभ्यास करणं कठीण होतं, पण मी स्वतः अभ्यास केला आणि हळूहळू सगळं सोपं झालं. आता माझं स्वप्न आयएएस अधिकारी बनण्याचे आहे. मी रोज सकाळ-संध्याकाळ 2-3 तास अभ्यास करत होते.
‘इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाइंड’मधील अंध विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठे आव्हान अभ्यासासाठी साहित्य जमा करणे होते. ऑडिओ बुक्सची कमतरता आणि ब्रेल लिपीतील पुस्तकांची मर्यादित उपलब्धता यामुळे विद्यार्थ्यांना यूट्यूब आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा आधार घ्यावा लागला. पण या सगळ्यातून वाट काढत आणि प्रतिकूलतेवर मात करून कैफीसारख्या अनेक अंध मुलांनी यश संपादन केले आहे.
Inspiring story