स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
हजारो वर्षांपूर्वी भारतात अनेक परकिय लोक आले आणि इथे स्थायिक झाले. इथल्या मातीशी त्यांची नाळ जोडली. भारतीय परंपरा, संस्कृती त्यांनी आपलीशी केली. असाच एक समाज म्हणजे ‘ज्यू समूदाय’. भारतातील ज्यू समाज बेने इस्त्राईली, बगदादी ज्यू, कोचीन ज्यू आणि बेनेई मेनाशे या चार गटात विभागला गेला. यामध्ये महाराष्ट्रातील ज्यू हे ‘बेने इस्त्राईली’ म्हणून ओळखले जातात. आजही इस्त्रायलमध्ये अभिमानाने मराठी बोलली जाते आणि जे मराठी बोलतात ते बेने इस्त्राईली म्हणून ओळखले जातात.
महाराष्ट्रातून जगाच्या कानाकोपर्यात जाणारा मराठी माणूस आपल्यासोबत शिवरायांचा जाज्वल्य अभिमान, मराठी संस्कृती आणि मराठी भाषेची गोडी सोबत घेऊनच जात असतो. त्यामुळे जगभरात अनेक ठिकाणी सध्या मराठी भाषिक लोक मराठी सण, उत्सव दणक्यात साजरे करताना पाहायला मिळतात. तसेच, मराठी खाद्यसंस्कृतीही जोपासली असल्याचे अनेकदा दिसून येते. इस्त्रायलमध्ये स्थलांतरीत झालेल्या बेने इस्त्राईली या भारतीय मराठी ज्यू लोकांनी आजही मराठी संस्कृती आणि भाषा जतन केली आहे.
जगभरातील ज्यू आणि हे बेने इस्राईली यांच्यात अनेक बाबतीत फरक आहेत. इतर देशांमध्ये ज्यूंवर अत्याचार झाल्याने ते आपल्याच ज्यू लोकांमध्येच राहिले. याउलट कोकणातले ज्यू इथल्या स्थानिकांमध्ये मिसळले. एवढंच नाही, तर त्यांनी इथल्या लोकांच्या चालीरीतीही आपल्याशा केल्या.
कुठून आले बेने इस्राईली?
दोन हजार वर्षांपूर्वी इस्राईलमधून काही ज्यू कुटुंबांना घेऊन जाणारं एक जहाज कोकण किनार्यावर अलिबागजवळ फुटलं. या जहाजातले सात पुरुष आणि सात महिला वगळता सगळेच बुडून मेले. हे १४ जण अलिबागजवळच्या नवगाव या खेड्याच्या किनार्याला लागले आणि भारतात आणखी एका धर्माची पाऊलखुण उमटली. या १४ जणांनी त्यांच्याबरोबर आलेल्या, पण बुडून मरण पावलेल्यांवर नवगावच्या किनार्याजवळच अंत्यसंस्कार केले. ही भारतातली पहिली ज्यू दफनभूमी होती. त्यावेळी रायगड जिल्ह्यात राहणार्यांना या नव्या लोकांचं आकर्षण वाटणं स्वाभाविक होतं. वेगळी भाषा बोलणारे, चालीरीती वेगळ्या असणार्या या लोकांना विचारलं असता त्यांनी आपण ‘बेने इस्त्राईली’ असल्याचे सांगितले. हिब्रू भाषेत बेने म्हणजे मुलगा. त्यामुळे बेने इस्राईल म्हणजे इस्राईलचं मूल असा अर्थ होतो.
‘शनिवार तेली’ का म्हणतात?
बेने इस्राईली समाज महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर विखुरला आहे. तेल गाळणं हा यांचा मुख्य व्यवसाय होता. त्यांचे तेलाचे घाणे असायचे. तसेच शनिवारी ते काम बंद ठेवायचे. त्यामुळे त्यांना कोकणात ‘शनिवार तेली’ म्हणूनही ओळखले जाते. या शनिवार तेलींनी हळूहळू स्थानिक संस्कृतीशी मिसळून राहायला सुरुवात केली. ते ज्या गावात राहिले त्या गावच्या नावावरून आडनावं घेतली. राजपूरकर, तळकर, नौगावकर, दांडेकर, दिवेकर, रोहेकर, पेणकर, पेझारकर, झिराडकर, चेऊलकर, अष्टमकर, आपटेकर, आवासकर, चिंचोलकर, चांडगावकर अशी साधारण ३५० आडनावं बेने इस्रायली मध्ये आढळतात.
ब्रिटिश राजवटीच्या काळात कोकणातले बेने इस्राईली मुंबईत स्थिरवले. १९४८ मध्ये इस्राईल राष्ट्राची निर्मिती झाली. त्यावेळी जगभरातल्या ज्यूंनी आपल्या ‘प्रॉमिस्ड लँड’मध्ये परत यावे, अस आवाहन करण्यात आले आणि या आवाहनाला प्रतिसाद देत भारतातल्या बेने इस्राईलींनीही टप्प्याटप्प्याने इस्राईलकडे जायला सुरुवात केली. मात्र, त्यांची मराठी आणि पारंपरिक संस्कृतीची नाळ कायम राहिली.
पारंपरिक संस्कृतीची नाळ आजही कायम
बेने इस्राईली लोकांच्या लग्नात हळद होते, मुंडावळ्या बांधल्या जातात. नववधू हिरव्या रंगाचा चुडाही भरते. सत्यनारायणाची पूजा जशी केली जाते, तसे बेने इस्राईली मलिदा नावाचा विधी करतात. ‘मलिदा हे प्रकरणही सत्यनारायणासारखं आहे. कोणत्याही शुभ कार्यानंतर किंवा आधी मलिदा करतात. लग्नानंतर, मूल झाल्यावर, कोणत्याही शुभ प्रसंगी मलिदा करतात. लग्नात वधुला मेहेंदी लावतात. या वधुच्या हातावरील मेहेंदी आणि तिच्या हातातील हिरवा चुडा त्यांचे वेगळेपण दर्शवतो.
मराठी शिकण्याची तळमळ
इस्राईलमध्ये गेलेल्या बेने इस्राईलींना अजूनही मराठी भाषेबद्दल प्रचंड आस्था आहे. मराठी शिकण्यासाठीची त्यांची तळमळही वाखाणण्याजोगी आहे. आजही बेने इस्राईल मराठी भाषेतच बोलतात. इस्त्राईलमधील तेल अवीव विद्यापीठातही मराठी भाषेचे वर्ग सुरू करण्यात आले होते.
किर्तनही आपलंसं केले
महाराष्ट्रात किर्तन हे प्रबोधनासाठी एक महत्त्वाचं माध्यम म्हणून वापरले गेले. किर्तन हे मराठी संस्कृतीचा एक भाग आहे. किर्तनाचा हा प्रभाव इतर धर्मांवरही पडला. विशेषत: बेने इस्रायली या ज्यू मंडळींनी आपल्या धार्मिक चालीरिती, प्रार्थना कायम ठेवल्या असल्या तरी कोकणातल्या विशेषतः उत्तर कोकणातल्या चालीरितींचा, सामाजिक व्यवस्थेचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि किर्तनही त्यातून सुरू झाले. मात्र, ही किर्तन परंपरा बेने इस्त्रायली लोकांनी कशी स्वीकारली याचा मोठा रोचक इतिहास आहे. १८८० च्या आसपास हिंदू कीर्तनकार रावसाहेब शंकर, पांडुरंग पंडित यांची काही किर्तने बेने इस्रायली मंडळींनी ऐकली. हिंदू मंडळी आपली पुराणं, पुराणकथा, भक्ती, भजनं या परंपरा कायम ठेवण्य़ासाठी तसेच धर्मशास्त्रातील गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किर्तनाचा वापर करतात असल्याने या गोष्टी सहजपणे लोकांपर्यंत पोहचतात हे त्यांच्या लक्षात आले. यामुळेच १८८० साली डेव्हिड हाईम दिवेकर, बेंजामिन शिमसन अष्टमकर, सॅम्युएल माझगावकर, राहमिम श्लोमो तळकर, हन्नोक श्लोमो तळकर आणि आयझॅक अब्राहम तळेगावकर या सहा मंडळींनी आपल्या ज्यू धर्मग्रंथातील कथा किर्तनातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आणि ‘किर्तनोत्तेजक मंडळ’ नावाने संस्थाच स्थापन केली. या सहा जणांनी किर्तनाचे काही नियमही ठरवून घेतले. जसे बिदागीची अपेक्षा करू नये, खिरापत वाटू नये वगैरे.
बेंजामिन अष्टमकर आणि डेव्हिड दिवेकर या संस्थेचे मुख्य किर्तनकार झाले आणि इतर चौघांनी गायक म्हणून काम करायला सुरुवात केली. या संस्थेचं पहिलं किर्तन अष्टमकर यांनी १८८० साली केले. त्या किर्तनात त्यांनी अब्राहम चरित्र ही कथा व तिचं निरुपण केलं. ८ ऑगस्ट १८८० साली पहिलं किर्तन झालं त्याचं १८८२ साली पुस्तकही आब्राहम चरित्र नावाने प्रसिद्ध झाले. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बेंजामिन अष्टमकर आणि हन्नोक तळकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. याबाबत ते म्हणतात, ‘आपल्या लोकांत सुधारणा व्हावी म्हणून आम्ही आपल्या अल्प शक्तीप्रमाणे अनेक वेळा प्रयत्न केले आणि ईश्वर कृपेनें ते सफलही झाले म्हणून आम्ही जगदीशाचे फारच आभारी आहोत. आमच्या शुद्ध हेतूनें आम्ही कविताबद्ध आब्राहाम चरित्र तयार करुन त्याच्या भक्तीभावाविषयी कीर्तन केले.’
बेने इस्रायली मंडळी मराठीतच बोलत असल्यामुळे त्यांनी किर्तनासाठी हीच भाषा निवडली. बेने इस्रायलींचा विवाह समारंभ, नामकरण सोहळा. गृहप्रवेश समारंभांमध्ये ही किर्तने होऊ लागली.
अब्राहम चरित्रानंतर एस्तेर चरित्र, योसेफाख्यान, एलियाहू हन्नाबीचे आख्यान, एस्तेर राज्ञीचरित्र, गुरू मोशे चरित्र, राणा शलोमोख्यान, मोशे चरित्र, मकाबी वीरांचे शौर्य अशी नवी किर्तनेही यात सामिल झाली. १९२१ पर्यंत अनेक नव्या ज्यू हरदासांनी किर्तनं आपल्या समुदायात नेली. कालांतराने महिलाही किर्तन करू लागल्या. फ्लोरा सॅम्युएल, लेखिका रेचल गडकर यांनीही किर्तन परंपरेला हातभार लावला. हॅना रोहेकर, अॅनी झिराड याही किर्तनकार तयार झाल्या.
… पुन्हा नव्याने किर्तन सुरू
काळाच्या ओघात भारतात, महाराष्ट्रात अनेक स्थित्यंतरं झाली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक सामाजिक, राजकीय बदल झाले. नवं तंत्रज्ञान आलं, भक्तीचे, करमणुकीचे मार्ग उपलब्ध झाले. या रेट्यात ज्यू लोकांची किर्तनही काहीशी थंडावला. काळाच्या ओघात पुसट झालेली ही परंपरा नव्याने सुरू करण्याचा विचार २०१५ साली झाला. मुंबईत राहाणार्या एलायजा जेकब यांच्यासह त्यांचे काही सहकारी एकत्र आले आणि त्यांनी ही किर्तनं नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही लोकांनी किर्तनाच्या जुन्या वह्या, डायर्या त्यांना दिल्या आणि या किर्तनांना नवं रुप आलं.
जेकब यांच्यासह डायना कोर्लेकर, रिवका मोशे, रिबेका रामरजकर, बेंजामिन अष्टमकर, सीमा झिराड, राफेल रोनेन, जुडाह सानकर, रुबी कुरुलकर, आयझॅक शापूरकर, सोलोमन चेऊलकर, निस्सिम पिंगळे, नरेश गमरे यांनी हा वसा हाती घेतला. आज हा गट एकत्र जमून किर्तनांचा सराव करतो. या गटाचे विविध ठिकाणी कार्यक्रमही झाले आहेत.






