भारताला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट पक्षी छायाचित्रासाठी पुरस्कार
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे संभाजीनगरहून
छत्रपती संभाजीनगर येथील आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार बैजू पाटील यांनी भारतीय वन्यजीव छायाचित्रणाचा अभिमान वाटेल असे ऐतिहासिक यश संपादन केले आहे. भारताला पहिल्यांदाच पक्षांच्या हालचालींच्या उत्कृष्ट छायाचित्रासाठी पुरस्कार मिळाला आहे. ‘वर्ल्ड बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर २०२५’ या स्पर्धेत बैजू पाटील यांनी दुसरे स्थान पटकावत भारतासाठी रौप्य पदक जिंकले.
युनायटेड किंगडममध्ये आयोजित या स्पर्धेत जगभरातील ३३,००० पेक्षा अधिक छायाचित्रकारांनी सहभाग घेतला. जवळपास ५० लाख छायाचित्रातून अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे काढलेल्या स्वॉलो या पक्षांच्या काढलेल्या छायाचित्राने जागतिक स्तरावर रौप्य पुरस्कार पटकाविला. ही स्पर्धा जागतिक पातळीवर पक्षी छायाचित्रणाचा सर्वोत्तम मानक मानली जाते.
या छायाचित्रात एक पक्षी उडतानाचा क्षण विलक्षण कोनातून टिपला आहे. बैजू पाटील यांनी जमिनीवर उलटे झोपून, शरीरावर गवत टाकून जवळपास दोन तास वाट पाहिल्यावर पक्षांना तिथे कोणी नाही असा अंदाज आल्यावर ते परत उडू लागले. त्यावेळी वाईल्ड लेन्सचा वापर करून त्यांनी काही छायाचित्रं टिपली. झेंडूच्या फुलांच्या शेतातून नेमके हे क्षण त्यांनी कॅमेर्यात कैद केलेआहे.
याविषयी बैजू पाटील म्हणाले, मागील बारा वर्षांपासून प्रयत्न करत होतो, अखेर सुंदर असं छायाचित्र मिळालं आणि पुरस्कारही मिळाला. आतापर्यंत राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय असे १६५ पुरस्कार मिळाले असून यंदाचा पुरस्कार विशेष आहे. अतिशय अवघड अशी ही स्पर्धा असते. संपूर्ण जगामध्ये आपल्या भारताचे नाव झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी या स्पर्धेमध्ये सहभाग घेत होतो आणि या वर्षी मला याकरता पुरस्कार भेटला आहे. खूप छान वाटत आहे.






