- आधुनिक सावित्रीची अनोखी संघर्षगाथा
स्वदेश न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे थेट बारामतीहून…
घरची परिस्थिती अतिशय बेताची… अशातच पतीचे गंभीर आजारपण.. उपचाराचा खर्च एक लाख… अशा परिस्थितीत आजीबाईची नजर पडते एका जाहिरातीवर… मॅरेथाॅन स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे बक्षीस एक लाखाचे… आजी तशीच उठते आणि स्पर्धेत सहभागी होते. जिवाच्या आंकाताने बेफाम धावत सुटते आणि स्पर्धा जिंकून दाखवते.. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कथा आहे बारामतीतील लता करे यांची.
पतीच्या आजारपणावरील औषधोपचारासाठी पायात अनवाणी धावून चक्क मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या लता करे या आधुनिक सावित्रीची संघर्षमय आयुष्याची कहाणी एकदा जाणून घेतलीच पाहिजे.
बारामतीच्या ६६ वर्षीय लता करे यांच्यावर आधारित ‘लता भगवान करे; एक संघर्षगाथा’ हा खरोखरच एक मराठी चित्रपट साकारला गेला असून त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील गौरवण्यात आले आहे.
या विषयी लता करे म्हणतात, एका अतिशय गरीब सामान्य कुटुंबात कष्ट करुन रोजचा उदरनिर्वाह होण्यासाठी प्रपंच करणा-या माझ्यासारख्या एका महिलेला एवढा राष्ट्रीय मानसन्मान मिळेल, माझ्यावर एक चित्रपट चित्रित केला जाईल आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती, असं त्यांनी म्हटलं आहे. एका स्वप्नाप्रमाणं माझ्यासाठी हे सगळं असल्याचं त्यांनी सांगितले. लता करे या मूळच्या बुलडाण्याच्या असून, बारामतीमध्येच त्यांचा अख्खा जीवनप्रवास सुरू झाला.
मॅरेथॉन म्हटल्यावर डोळ्यासमोर दिसते ते ट्रेक सूट , शूज, आणि बरेच काही. परंतु, गरजेला एखादी स्त्री कोणत्याही संकटाला कोणत्याही परिस्थितीत सामोरी जाऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे या लता करे. या बक्षिसाच्या रकमेसाठी त्या विना शूज अथवा चप्पल वापरता अक्षरशः अनवाणी आणि त्याही नऊवारी साडी नेसून धावल्या आणि स्पर्धा जिंकल्याही.
प्रसिध्दी माध्यमांनी लताबाईंची दखल घेतल्यावर रातोरात त्या स्टार बनल्या. त्यांची संघर्षमय कहाणी ऐकून नवीन देशबोनाई यांनी त्यांच्यावर एक चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि विशेष बाब म्हणजे केवळ त्यांच्या जीवनावर चित्रपट आला नाही तर या सिनेमामध्ये त्यांनी स्वतः आपल्या पत्राची भूमिका देखील साकारली आहे.
अभिनयाचे ज्ञान नसताना तसेच पाठी काहीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी हा सिनेमा मध्ये उत्कृष्ट काम करून जिद्दीनं त्याला पूर्णत्वाकडे नेले. परंतु, अजूनही त्यांना या गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे की, कोणी आपल्या जीवनावर चित्रपट तयार करेल व त्यामध्ये आपल्यालाच भूमिका करायला मिळेल आणि त्याहून सर्वात विशेष बाब म्हणजे या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येईल याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. आपल्या संघर्षमय जीवनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, ही गोष्ट माझ्यासाठी खूपच अभिमानास्पद आणि आनंददायी असल्याचे त्यांनी सांगितले.