स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून आपल्या विनोदी अभिनयाने घराघरात पोहोचलेला अभिनेता पृथ्वीक प्रताप आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनय क्षेत्रातील लोकप्रियतेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत पृथ्वीकने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील नदीचवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या सुधारणा आणि पुनर्बांधणीची जबाबदारी त्याने ‘पारिजात’ या संस्थेच्या सहकार्याने हाती घेतली आहे.
कमी पटसंख्येमुळे ही प्राथमिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर होती. विशेष म्हणजे, या शाळेच्या इमारतीचा पूर्वी गोदाम म्हणूनही वापर करण्यात आला होता. विद्यार्थ्यांची संख्या कमी होत गेल्याने शाळेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र, ग्रामीण भागातील मुलांचं शिक्षण थांबू नये, या उद्देशाने पृथ्वीक आणि ‘पारिजात’ संस्थेने शाळेला नवसंजीवनी देण्याचा निर्णय घेतला.
या उपक्रमांतर्गत शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि चांगलं शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सकारात्मक बदलाचा परिणामही दिसून येत असून, बंद होण्याच्या स्थितीत असलेल्या या शाळेची पटसंख्या आता २४ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे एकेकाळी ओस पडण्याच्या मार्गावर असलेली शाळा पुन्हा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजू लागली आहे.
आपल्या या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना पृथ्वीक प्रतापने शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. “एका मुलाच्या शिक्षणासाठी केलेली छोटीशी मदत त्याच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. केवळ शाळा उभी करणे हा पहिला टप्पा असून, त्यातून मुलांना पुढे जाण्याची संधी मिळणे हा खरा उद्देश आहे,” असा विश्वास त्याने व्यक्त केला.
‘समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो’, या भावनेतून सुरू केलेला पृथ्वीकचा हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरत आहे. प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचा उपयोग केवळ स्वतःपुरता न करता समाजातील गरजू घटकांसाठी करण्याचा त्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उचललेलं हे पाऊल सामाजिक बांधिलकीचं प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.






