स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे आयर्लंडहून
आज जगासमोर उभ्या असलेल्या सर्वात मोठ्या पर्यावरणीय समस्यांपैकी एक म्हणजे प्लास्टिक प्रदूषण. प्लास्टिकचा कचरा वर्षानुवर्षे नष्ट होत नाही आणि त्याचे अतिसूक्ष्म कण म्हणजेच मायक्रोप्लास्टिक्स पाणी, माती आणि अन्नसाखळीतही पोहोचत आहेत. मात्र, या गंभीर समस्येवर एका तरुण विद्यार्थिनीने आशेचा किरण दाखवला आहे.
आयर्लंडमधील अवघ्या १८ वर्षीय आर्या सतीश हिने ‘इको पर्ज’ नावाचे वनस्पती-आधारित जैवविघटनशील प्लास्टिक शोधून काढले आहे. हे प्लास्टिक नैसर्गिकरीत्या नष्ट होत असतानाच आजूबाजूच्या माती व पाण्यातील घातक मायक्रोप्लास्टिक्सचेही विघटन करते. या संशोधनासाठी तिला द अर्थ प्राइज २०२६ चे युरोपियन प्रादेशिक विजेतेपद मिळाले असून १२,५०० डॉलर चे पारितोषिकही मिळाले आहे.
‘इको पर्ज’ हे पारंपारिक प्लास्टिकला पर्याय म्हणून वनस्पतींपासून बनवले आहे. योग्य वातावरणात हे प्लास्टिक अवघ्या दोन आठवड्यांत नैसर्गिकरीत्या नष्ट होते.नष्ट होत असताना हे प्लास्टिक विशेष एन्झाईम्स सोडते, जे सभोवतालच्या परिसरातील पीईटी मायक्रोप्लास्टिक्सला संपवण्यास मदत करतात.
हे विशेष एन्झाईम मिळवणे आर्यासाठी खूप महाग आणि कठीण होते.तिने युरोप व अमेरिकेतील अशा कंपन्या शोधण्यासाठी चॅटजीपीटी ची मदत घेतली जी एन्झाईम्सवर काम करतात.त्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने तिने डेन्मार्क आणि जर्मनीतून हे आवश्यक घटक मिळवले आणि आपला प्रयोग यशस्वी केला.
जर आर्या सतीश प्रोटोटाइप आणि उत्पादन यांमधील अंतर यशस्वीपणे पार करू शकली, तर तिचा शोध एक खरा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. यातून हे सिद्ध होईल की, केवळ प्रस्थापित संशोधन संस्थांमधूनच नव्हे, तर दृढनिश्चयी तरुण नवोन्मेषकांमधूनही खोलवर रुजलेल्या पर्यावरणीय समस्यांवर अर्थपूर्ण उपाय समोर येऊ शकतात.
आर्या सतीश तिच्या ‘अर्थ प्राईज’ या पारितोषिकाचा वापर ‘इको पर्ज’मध्ये सुधारणा करण्यासाठी आणि ते व्यावसायिक उत्पादनासाठी तयार करण्यासाठी करणार आहे.
तिला आशा आहे की पॅकेजिंग कंपन्या, बायोप्लास्टिक उत्पादक आणि कचरा पिशव्यांचे उत्पादक कालांतराने हे तंत्रज्ञान स्वीकारतील. तसेच दीर्घकाळात, तिला स्वतःची बायोप्लास्टिक्स कंपनी सुरू करायची आहे. प्लास्टिकचा कचरा कमी करणारी आणि त्याच वेळी सध्याच्या मायक्रोप्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्यास मदत करणारी टिकाऊ सामग्री विकसित करणे, हे तिचे ध्येय आहे.
सामान्य प्लास्टिकप्रमाणे कचरा निर्माण करण्याऐवजी भविष्यात असे प्लास्टिक वापरता आले, तर प्लास्टिकचा वापर आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण या दोन्ही समस्यांवर एकाच वेळी काम करता येऊ शकते. पर्यावरणासाठी हा विचार नक्कीच खूप महत्त्वाचा आहे.
आर्याची ही कल्पना आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते—पर्यावरण वाचवण्यासाठी मोठे होण्याची गरज नसते; मोठा विचार करण्याची गरज असते





