स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे अहमदाबादहून
अहमदाबादमध्ये मध्ये साबरमती परिसरातील अचेर एएमटीएस बस स्थानकावर देशातील पहिले अनोखे ‘ट्री-इंटीग्रेटेड’ ग्रीन बसस्टॉप सुरू करण्यात आले आहे. साबरमती परिसरातील एका जुन्या झाडाची तोड न करता, त्याच झाडाभोवती आकर्षक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने या बसस्टॉपची रचना करण्यात आली आहे.
या उपक्रमात जुने आणि मोठे झाड न कापता संरचनेचे मुख्य केंद्र बनवले आहे. नैसर्गिक थंडाव्यासाठी ‘व्हर्नोनिया एलिप्टिका’ या वेलीची लागवड करण्यात आली असून, येत्या काही महिन्यांत ती नैसर्गिकरीत्या छतावर पसरून संपूर्ण छत हिरवाईने झाकेल. बांधकामातील कचऱ्यापासून तयार केलेले पेव्हर ब्लॉक वापरले आहेत.पर्यावरणाचा विचार करून उभारण्यात आलेल्या या बस शेल्टरमध्ये थंडावा मिळण्यासाठी ग्रीन रूफ, सौरऊर्जा पॅनेल, एलईडी दिवे आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.
या उपक्रमात प्रवाशांना सावली आणि आराम देण्याबरोबरच शहरी पायाभूत सुविधा अधिक पर्यावरणपूरक आणि शाश्वत बनविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
महानगरपालिकेने प्रत्येक झोनमध्ये ५ प्रमाणे शहरात १०० हून अधिक ग्रीन बस शेल्टर उभारण्याचे नियोजन केले आहे.
महापौर हितेश बरोट, महानगर आयुक्त बंछनिधी पाणी, स्थायी समितीचे अध्यक्ष कमलेश पटेल आणि महानगरपालिकेतील इतर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक, आरामदायी आणि आकर्षक सार्वजनिक वाहतूक सुविधा उभारण्याच्या एएमसीच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.





