स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून
आत्मनिर्भरतेची प्रतिक असलेली आणि पुण्यातील स्वदेशी तंत्रज्ञानची ताकद असलेली ‘आयएनएस उदयगिरी’ ही आधुनिक युद्धनौका नुकतीच भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली आहे. यामुळे भारतीय नौदलाचे सामर्थ्य अधिकच वाढले आहे. नौदलाच्या शक्तीला मजबुती देण्यासाठी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड (केबीएल) या पुण्यातील कंपनीने त्यात योगदान दिले आहे. त्यांनी युद्धनौकेसाठी विशेष प्रकारचे ‘कॅन्ड मोटर पंप’ पुरवले आहेत. या अत्याधुनिक युद्धनौकेच्या उभारणीत केबीएलच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा वाटा आहे.
‘आयएनएस उदयगिरी’ ही सात नव्या ‘युद्धनौका’पैकी दुसरी नौका आहे. पारंपरिक तसेच असमान धोके ओळखून त्यांना सामोरे जाण्याची क्षमता या नौकेमध्ये आहे. खोल समुद्रात मोहीम पार पाडणार्या या युद्धनौकेसाठी ‘किर्लोस्कर’ने २२ आणि ३० किलोवॅट क्षमतेचे कॅन्ड मोटर पंप विकसित केले आहेत. हे पंप पूर्णपणे बंदिस्त, गळतीविरहित, सुरक्षित आणि आवाजरहित आहेत. त्यामुळे ते युद्धनौकेच्या कार्यक्षमतेत भर घालणारे ठरले आहेत.
‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ‘केबीएल’ने यापूर्वीही विविध संरक्षण प्रकल्पांमध्ये यशस्वीरीत्या काम केले असून, नौदलासाठीची ही नवी पूर्तता त्यांची तांत्रिक ताकद दर्शवते.
याबाबत केबीएल ने म्हटले की या पंपांचा उपयोग जहाजावरील विविध द्रव व्यवस्थापन प्रक्रियांसाठी होतो. ‘आयएनएस उदयगिरी’ची यशस्वी उभारणी आणि त्यात ‘केबीएल’चा सहभाग, देशाच्या संरक्षण स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल मानले जात आहे. नौदलाच्या आधुनिकीकरणातील या टप्प्यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वाढते कौशल्य अधोरेखित झाले आहे.
‘आयएनएस उदयगिरी’ ची वैशिष्ट्ये
आयएनएस उदयगिरी ही सात नव्या ‘युद्धनौका’पैकी दुसरी नौका आहे. पारंपरिक तसेच असमान धोके ओळखून त्यांना सामोरे जाण्याची क्षमता या नौकेत आहे. अतीवेगाने मारा करणारी अँटी-शिप क्षेपणास्त्रे, मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली, ७६ मिमी लांबीचा मुख्य तोफ आणि अनेक क्लोज-इन वेपन सिस्टीम्स यांचा समावेश आहे, जे हवाई आणि समुद्री धोक्यांचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज आहेत.
उदयगिरी युद्धनौकेची माहिती
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएसएल) येथे बांधलेली प्रोजेक्ट १७ ए श्रेणीतील स्टेल्थ युद्धनौका प्रकारातील दुसरी नौका उदयगिरी आहे. या युद्धनौका ‘नील जल’ वातावरणातील परिचालनास सुयोग्य असून, भारताच्या सागरी हितसंबंध क्षेत्रातील पारंपरिक आणि अपारंपरिक धोक्यांना तोंड देण्यास सक्षम आहेत. उदयगिरी हा त्याच्या पूर्वीच्या ‘आयएनएस उदयगिरी’चा आधुनिक अवतार आहे. ते ३१ वर्षांच्या सेवेनंतर २४ ऑगस्ट २००७ रोजी निवृत्त झाले होते.
हिंद महासागर क्षेत्रात स्वदेशी नौदल क्षमता आणि सागरी वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. उदयगिरीमुळे जहाजाची रचना, जहाज बांधणी आणि अभियांत्रिकी कौशल्य यातील देशाच्या सामर्थ्याचे दर्शन घडते.






