स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून
लाल मातीतच रमणारा… कुस्तीवर मनापासून प्रेम करणारा… धिप्पाड देहाचा… युवकांचे प्रेरणास्थान असलेला अवघ्या २१ व्या वर्षी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारा पै. पृथ्वीराज मोहोळ आज गप्पांच्या मैदानात उतरला होता. निमित्त होते आपल्या ऐश्वर्य कट्ट्याचे.. गप्पांचा फड जमला आणि हा महाराष्ट्रकेसरीसुद्धा गप्पांच्या मैदानात मनमुराद रंगून गेला.
प्रसिद्ध उद्योजक प्रभाकरअण्णा मोहोळ यांच्या हस्ते पृथ्वीराज मोहोळ याचा ऐश्वर्य कट्ट्यावर विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शरीराच्या सुदृढतेसह हृदयाचे स्वास्थ्यदेखील तितकेच महत्त्वाचे आहे हे सांगण्यासाठी प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि हार्टबीट फाउंडेशनचे संस्थापक डाॅ. ओंकार थोपटे हेदेखील आवर्जून ऐश्वर्य कट्ट्यावर उपस्थित होते. त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी पृथ्वीराज म्हणाला, “महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा जिंकल्यानंतर माझ्यावर रोजच कौतुकाचा वर्षाव होतो आहे. रोजच कुठे ना कुठे सत्कार होतो आहे. पण इतक्या मनमोकळ्या वातावरणात, प्रेमाने ऐश्वर्य कट्ट्यावर झालेला सत्कार सगळ्यात वेगळा आहे.”
आपल्या निखळ आणि प्रांजळ संवादातून पृथ्वीराजने हृदयाला हात घातला आणि उपस्थितांचीही मने जिंकली.
तो पुढे म्हणाला, महाराष्ट्र केसरीची गदा मोहोळ कुटुंबात यावी ही सगळ्यांचीच इच्छा होती. गेल्या वर्षी प्रयत्न करूनदेखील संधी हुकली होती. या वर्षी मात्र मी हा विजय मिळाला. महाराष्ट्र केसरीची गदा मोहोळ कुटुंबात आणू शकलो याचा मला खूप आनंद आहे. आता राष्ट्रीय स्तरावर कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न असून हिंदकेसरचे ध्येय आहे”
कोरोनाच्या अवघडकाळातसुद्धा कुस्तीचा सराव आणि सातत्य कसे राखले याविषयीही पृथ्वीराजने आवर्जून सांगितले.
या वेळी डाॅ. ओंकार थोपटे यांनी आजवर केलेल्या ५० हजार हृदयशस्त्रक्रियांचा उल्लेख केला व ते म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढते आहे. आजकाल तरुणांमध्येही हे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे वर्षातून एकदा तरी हृदयाची तपासणी करणे आवश्यक आहे. याला पैलवानसुद्धा अपवाद नाहीत.
प्रभाकरअण्णा मोहोळ म्हणाले, ऐश्वर्य कट्टा हा फार वेगळा उपक्रम आहे त्याची सगळीकडे चांगली चर्चा आहे. अशा स्वरुपातील कट्टे शहराच्या विविध भागांत सुरू होणे गरजेचे आहे. मात्र ऐश्वर्य कट्टाने एक वेगळीच उंची गाठलेली आहे.
या प्रसंगी अप्पा रेणुसे, विलासराव भणगे, दिलीप जगताप, पराग पोतदार, शंकर कडू, सचिन डिंबळे, सर्जेराव शिळीमकर, पांडुरंग मरगजे, नेमीचंद सोळंकी, आकाश वाडघरे, युवराज रेणुसे, संदीप फडके, विराज रेणुसे, काशिनाथ शेंडकर, मंगेश साळुंखे, नितीन राजने, रोहित रेणुसे, महावीर डाखलिया, सुनील सोनवणे, संदीप भोसले, दत्ता तोडकर, मयूर संचेती, अभिराज रेणुसे, सोनबा गोरे, चंद्रकांत पाटील, राजीव अधिकारी, शशिकांत पवार, नितेश भिकुले, अनिकेत सोनवणे, विश्वनाथ वाल्हेकर, उत्तम तनपुरे, शिवाजी मोरे व आप्पा रेणुसे मित्रपरिवार उपस्थित होते.