पुणे (प्रतिनिधी) : जोपर्यंत संघर्षाचे मोल कळत नाही तोपर्यंत आयुष्य घडत नाही. त्यामुळे आपल्या मुलांना सगळे काही आयते मिळू देऊ नका. इन्स्टा व्हिडिओ बघून यश मिळत नसते. कष्टातून, संघर्षातूनच आयुष्याला खरा आकार मिळतो हे कायम लक्षात ठेवा, असा संदेश आयपीएस अधिकारी व अँटी करप्शन ब्युरोचे अतिरिक्त महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी दिला.
चिंतामणी ज्ञानपीठ व अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऐश्वर्य व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पर्वात ‘कर हर मैदान फतेह’ या विषयावर त्यांनी अतिशय उद्बोधक आणि प्रेरणादायी असे व्याख्यान गुंफले. अण्णा भाऊ साठे सभागृहात रंगलेल्या या व्याख्यानमालेसाठी सभागृह खचाखच भरलेले होते आणि त्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
या प्रसंगी व्यासपीठावर चिंतामणी ज्ञानपीठाचे अध्यक्ष अप्पा रेणुसे, नगरसेवक युवराज बेलदरे, नगरसेविका राणी भोसले, अश्विनी भागवत, रूपाली ठोंबरे, गौरी जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, उद्योजक विजयशेठ जगताप, अभय मांढरे, विलासराव भणगे, नेमीचंद सोळंकी, शंकरराव कडू, युवराज रेणुसे, अॅड. दिलीप जगताप, सचिन डिंबळे, सर्जेराव शिळीमकर, प्रदीप देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांना वंदन करून आणि त्यांची आरती गाऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
शिवशाहीचे प्रतिक असणारा जिरेटोप, पांडुरंगाची मूर्ती, शाल, सन्मानपत्र, ज्ञानेश्वरी व पुस्तके देऊन विश्वास नांगरे पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
तासभर रंगलेल्या व्याख्यानात विश्वास नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले. आपल्या आयुष्याला दिशा कशी द्यावी, चुकीच्या गोष्टींपासून स्वतःला दूर कसे ठेवावे आणि आयुष्यात यशस्वी कसे व्हावे या विषयी त्यांनी मौलिक असे मार्गदर्शन केले.
विश्वास नांगरे पाटील म्हणाले, स्वतःला घडवायचे तर स्वतःमध्ये रोज सुधारणा कशी होत जाईल याचा विचार करायला हवा आणि तशी पावले टाकायला हवी. रोज वेगळा दिवस आणि आव्हाने असतात, त्यातून तावून सुलाखून आपल्या आयुष्याला दिशा द्यायला हवी. त्यासाठी कम्फर्ट झोन सोडून कष्ट करायलाच हवे. यश सहज मिळत नाही त्यासाठी कष्ट करावेच लागतील हे कायम लक्षात ठेवा. सकारात्मक वृत्ती ठेवून आपल्या क्षमता व बलस्थाने लक्षात घेऊन जीवनाची पुढची दिशा ठरवा. भीती, न्यूनगंड आणि चिंता या आपल्या आयुष्याला पोखरणाऱ्या गोष्टी आहेत हे कायम लक्षात ठेवा. चारित्र्यसंपन्न आयुष्य घडवताना आपण समाजाचेही देणे लागतो याचे भान कायम असू द्या.
ते पुढे म्हणाले, आयुष्यात इच्छाशक्ती असेल आणि त्यांना प्रयत्नांची जोड दिली तर अशक्य असे काहीच नाही. वयाच्या १६ व्या वर्षी सवंगड्यांना घेऊन छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. या वयात मेंदू विकसित होत असतो पण चांगले-वाईट यातील भेद कळत नसतो. त्यामुळे या काळातच मुलांना जपायला हवे. स्वप्न सत्यात उतरवायची तर कसून प्रयत्न करावे लागतील हे कायम लक्षात ठेवा.
या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेल्या साहिल पांडुरंग मरगजे, स्वप्ना कुंभार, आलोक मनोज तोडकर आणि आदर्श फलफले या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक अप्पा रेणुसे यांनी केले. सूत्रसंचालन पराग पोतदार यांनी केले. अॅड. दिलीप जगताप यांनी आभार मानले. श्रावणी देशमुख यांनी पसायदान सादर केले.
👌🌱