स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे युक्रेनमधून…
रशियाकडून युक्रेनवर सतत होणारे बॉम्बहल्ले, उद्धवस्त झालेले शहर, जीवनावश्यक वस्तूंची चणचण अशा वातावरणात मूळ पुण्याची असणारी डॉ. वैभवी नाझरे सन 2022 पासून कीव्ह येथील रुग्णालयात जखमी सैनिक, जखमी नागरिकांवर उपचार करण्यात गुंतलेली आहे. अखंड रुग्णसेवेचे व्रत पाळणाऱ्या या भारतीय मुलीचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.
आईला वैभवीने वकील व्हावे असे वाटत होते; पण वैभवीचा ओढा मात्र, वैद्यकीय क्षेत्राकडे होता. परदेशी जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्याचा मार्ग तिने निवडला. कीव्ह येथे इंग्रजीत वैद्यकीय शिक्षण घेता येईल, असे समजल्यावर तिने कीव्ह येथे बोगोमोलेट्स नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला आणि २०१७मध्ये ती युक्रेनला पोहोचली.
वैद्यकीय शिक्षणाची पहिली चार वर्षे सुरळीत पार पडली. वैद्यकीय पदवीच्या पाचव्या वर्षानंतर मात्र रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला तोंड फुटले. युद्धाने शहरे उद्ध्वस्त होत होती. अशा परिस्थितीत अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी परतीचा मार्ग पत्करला. वैभवीने मात्र तिथेच राहून जखमींची सेवा करण्याला प्राधान्य दिले.
वैद्यकीय पदवी अंतिम टप्प्यात आहे; आता शिक्षण पूर्ण करायचे आहे आणि आपण डॉक्टर असल्याने युद्धकाळात इथल्या लोकांवर उपचार करता येतील,असा विचार तिने केला. तसेच भारतावर जर अशी वेळ आली असती तर आपण देश सोडून गेलो नसतो,मग आता तरी का जायचे, इथे जास्त गरज आहे,’ असा माणुसकी जपण्याचा विचार केला आणि वैभवी युक्रेनमध्येच थांबली.
युद्धाचा कहर सुरू असताना तिने युक्रेनमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये मदतीसाठी येऊ का, असे विचारले. तिचे शेवटचे वर्ष सुरू असल्याने आणि युद्धकाळात डॉक्टरांची गरज असल्याने तिला परवानगी मिळाली. वैभवीने जखमी नागरिक, सैनिकांना मलमपट्टी करण्यापासून काम सुरू केले. तिचे कामातील कौशल्य पाहून मग ऑपरेशनसाठीही तिला मदतीला घेतले जाऊ लागले. नंतर नंतर लहान शस्त्रक्रियाही ती करू लागली. दिवसाचे अक्षरशः १७ तास ती काम करीत होती. यासाठी तिला कोणताही आर्थिक मोबदला मिळत नव्हता. दरम्यान, तिला वैद्यकीय पदवी मिळाली आणि तिने तेथेच पदव्युत्तर पदवीसाठी सर्जरीला प्रवेश घेतला.
या सगळ्याकडे पाहताना
डॉ. वैभवी नाझरे म्हणते, मी जन्मापासून पुणेकर आहे. माझे कॉलेज फर्ग्युसन होते. इथे झालेल्या विविध सामाजिक चळवळी मला पाहता आल्या. त्यांचा माझ्या व्यक्तिमत्त्व विकासावर प्रभाव आहे. त्यामुळेच युद्धकाळात युक्रेनमध्ये थांबण्याचा निर्णय मी घेऊ शकले.
युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून कौतुक
दरम्यान युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांच्यावरही वैभवीने उपचार केले. वैभवी भारतीय असल्याचे समजल्यावर कुलेबा यांनी युद्धकाळात युक्रेनमध्ये राहण्याचे धाडस दाखवून रुग्णसेवा करीत असल्याबद्दल तिचे कौतुक करणारे ट्विट केले होते.