माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा पुढाकार
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून
देवभूमी उत्तराखंडच्या स्वर्गारोहण मार्गावर पाच पांडव आणि द्रौपदीच्या भव्य ब्राँझच्या मूर्त्यांची स्थापना करण्यात आली आहे. माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या पुढाकाराने या मूर्त्यांची स्थापना करण्यात आली आहे. यातून तिथे येणाऱ्या काळात पर्यटनाचा ओघ वाढण्याची शक्यता आहे.
भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या या अनोख्या घटनेचे आजपर्यंत एकही स्मारक बांधण्यात आले नव्हते. परंतु माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षणतज्ञ, विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी तीन वर्षापूर्वी मांडलेल्या संकल्पनेनुसार धर्मराज युधिष्ठिर, पराक्रमी गदाधारी भीम, शूर धनुर्धारी अर्जुन, नीतिमान नकुल व शांत, सज्जन सहदेव आणि राणी द्रौपदीसह शेवटपर्यंत युधिष्ठिराच्या सोबत राहिलेल्या श्वानरूपी यमराज यांच्या भव्य कांस्य मूर्ती बनवून स्वर्गारोहण मार्गावर बसविण्यात आल्या आहेत.
या वर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला माणा गावाचे प्रमुख पीतांबरसिंह मोल्फाजी यांच्या सहकार्याने आणि माणाच्या सर्व ग्रामस्थांच्या सहभागाने त्यांची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या मूर्त्यांना त्यांच्या निश्चित ठिकाणी बसविण्यासाठी एमआयटीचे व्यवस्थापक दिलीप पाटील, अभियंता विष्णू भिसे व त्यांच्या टीम ने प्रयत्न केले.
२०११ मध्ये माणा ग्रामस्थांच्या वतीने मुख्य प्रधान पीतांबर सिंह मोल्फाजी यांच्या निमंत्रणावरून एमआयटी संस्थेने नदीच्या उमगस्थानी माँ. सरस्वतीचे मंदिर अवघ्या काही कालावधीत म्हणजे ६३ दिवसात बांधले आहे.
याचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाने मोठ्या उत्साहात पार पाडले. या सरस्वती मंदिराजवळ हवनकुंड आणि ध्यानकेंद्र ही बांधण्यात आले आहे. माणा गावात बांधलेल्या या सुंदर धार्मिक अध्यात्मिक कलाकृतींमुळे माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या ‘तीर्थ क्षेत्रांचे ज्ञान तीर्थक्षेत्रात’ रूपांतर करण्याच्या अनोख्या मोहिमेत महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
देवभूमी उत्तराखंडमध्ये वसलेल्या माणा गावाचे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामरिक महत्व विलक्षण आहे. भारत आणि चीनच्या सीमेवर वसलेले भारतातील पहिले गाव माणा हे अत्यंत पवित्र ब्रदीनाथ धामच्या अगदी जवळ आहे. माणा गावाच्या उत्तरेला माता श्री सरस्वती नदीचा उगम होतो, जिच्या सान्निध्यात महर्षी वेद व्यासजींनी ‘जय’ नावाचा इतिहास म्हणजे ‘महाभारत’ श्री गणेशजींना सांगितला असे मानले जाते.
कुरूक्षेत्राच्या भयंकर युद्धानंतर ३६ वर्षांनी भगवान श्रीकृष्ण वैकुंठाला गेल्यावर संकटात सापडलेल्या, दुखी झालेल्या पांडवानी आपले सिंहासन सोडून शारीरिक दृष्ट्या स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माणा गावातून स्वर्गारोहणाकडे जाणाऱ्या मार्गावरून सुमेरू पर्वताकडे निघाले होते. भारताच्या या सांस्कृतिक वारशाच्या या घटनेची दखल माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने घेतली आहे.
Khup sundar mahiti