ब्रिटिश नव्हे तर चंद्रगुप्त मौर्य असणार भारतीय जवानांचे प्रेरणास्थान
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
भारतीय लष्करावरील ब्रिटिशांचा प्रभाव दूर करण्यासाठी आता लष्कराने अनेक बदल करण्यास सुरुवात केलेली आहे. परंपरेच्या जोखडातून स्वतःला मुक्त करीत आता स्वदेशी वारे वाहू लागल्याचे दिसते आहे. त्यासाठी अनेक बदल करण्याचा निर्णय भारतीय लष्कराने घेतला आहे.
पाश्चात्य तज्ज्ञांचा अभ्यास करण्याऐवजी भारतीय रणनीतिकारांचा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे. ब्रिटिश अधिकारी नव्हे तर चंद्रगुप्त मौर्य हे आता भारतीय जवानांचे प्रेरणास्थान असणार आहेत. लष्करातील स्कॉटिश- ओरिजिन पाईप बँडची संख्या कमी करण्यात येणार आहे. लष्कराच्या विशिष्ट शस्त्रांना अधिक भारतीयत्त्व प्रदान केले जाणार आहे
ब्रिटिशांनी भारत सोडलेला असला तरी ब्रिटीश पद्धतींचा प्रभाव आजही लष्करावर दिसून येतो. हा प्रभाव कमी करण्यासाठी विविध विभागांत बदल करण्याचा निर्णय भारतीय लष्कराने घेतला आहे. भारताची राष्ट्रीय ओळख वेगळी राखली जावी हा पुढील काळात प्रयत्न केला जाणार आहे. जुने वसाहतवादी रीतिरिवाज आणि प्रथा बदलून सशस्त्र दलांना आधुनिक परिस्थितीनुसार घडवण्याचा यामागे हेतू आहे. यामुळे भारतीय सशस्त्र दलांची परंपरा अधिक सशक्त आणि राष्ट्रीय जाणीवेने प्रेरित असेल.
नव्याने तयार केल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमात आय एन ए, मराठा, शीख यांच्या युद्धतंत्राचा, राज राजा चोल पहिला आणि त्याचा मुलगा राजेंद्र चोल, राजा मार्तंड वर्मा, कुंजली मारक्कर चौथा यांसारख्या प्राचीन भारतीय राज्यकर्त्यांच्या सागरी रणनीतिचा, तसेच सम्राट चंद्रगुप्त मौर्य याच्या प्रशासनाच्या मॉडेलचा समावेश असेल. सध्या सशस्त्र दलातर्फे कालबाह्य कायदे आणि नियम वेगळे काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत निरुपयोगी कायदेही रद्दबातल ठरवून त्यामध्ये भविष्यात बदल करण्यात येतील.
नौदलाचे चिन्ह बदलून आणि लष्करी आस्थापन तसेच विभागांना आणि शस्त्रास्त्र प्रणालींना भारतीय नावे देण्यात आली आहेत. इतर राष्ट्रांबरोबरच्या बहुतेक संयुक्त सरावांना तसेच लष्करी संकुलातील ऑपरेशन्स आणि सेमिनार हॉलला देखील भारतीय नावे देण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षांत प्रजासत्ताक दिन आणि बीटिंग रिट्रीट समारंभांमध्ये भारतीय वाद्यांचा वापर वाढविण्यात आला असून तिथे वाजविली जाणारी धून देखील अस्सल भारतीयच ठेवण्यात आली आहे.
२०२२ च्या बीटिंग रिट्रीट सोहळ्यानंतर ‘अबाइड विथ मी’ या धूनची जागा देशभक्तीपर हिंदी गाणे असलेल्या ‘ए मेरे वतन के लोगो’ने घेतली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, भारतीय नौदलाने आपल्या नौदल मेसमध्ये पारंपारिक कुर्ता-पायजामा हा पोशाख परिधान करण्याची परवानगी दिली. व्यावसायिक लष्करी शिक्षण संस्था स्वदेशी नीतिमत्ता, कायदा आणि युद्धकलेच्या संकल्पनांचा प्रचार करण्यासाठी नियमित चर्चासत्रेही आयोजित केली जाणार आहेत.