- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विशेष सन्मान
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे लोणवळ्यातून
योगप्रसारासाठी अवघे जीवन समर्पित करून ५० वर्षांहून अधिक काळ देश-विदेशात योगप्रसार करणारे आत्मयोगगुरू डाॅ. संप्रसाद विनोद यांचा त्यांच्या या विशेष कार्यासाठी स्वामी कुवलयानंद योग पुरस्काराने विशेष गौरव करण्यात आला. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. कैवल्यधान संस्थेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोणावळा येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात कैवल्यधाम संस्थेच्यावतीने आत्मयोग-गुरु योगाचार्य आंतरराष्ट्रीय योगतज्ज्ञ डॉ. संप्रसाद विनोद, इन्स्टिट्यूट ऑफ नॉमिक्सचे कुलपती माजी उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. बी. एन. गंगाधर यांचा स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार देत सन्मान करण्यात आला. यावेळी कोविंद बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, डॉ. रणजित सिंग भोगल आदी उपस्थित होते.
लोणावळा येथील कैवल्यधाम या योगसंस्थेमध्ये स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार प्रदान करण्याचा नेटका दिमाखदार सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यात योगशिक्षण व योगप्रसार या क्षेत्रामधे विशेष योगदान देणार्या तीन महान व्यक्तिमत्वांना या कार्यक्रमामध्ये गौरविण्यात आले.
या प्रसंगी बोलताना माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, योग ही भारताची उत्पत्ती आहे. आज संपूर्ण जगात योगाचा प्रसार झाला आहे. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योगामुळे आपले आयुष्य संपूर्णतः सखोल बदलते. आपले आयुष्य चांगले, समाधानी आणि परिपूर्ण करण्याची योग ही शैली आहे. योगामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले रहाते. भारताने उर्वरित जगाला दिलेली ‘योग ‘ ही अनमोल देणगी आहे.”
सुरेश प्रभू म्हणाले, “एक चांगला माणूस घडविण्यासाठी योगकला आत्मसात करण्याची गरज आहे. योग केवळ शिकण्याची गोष्ट नाही.”
आपल्यामधील चांगला माणूस आपल्याला योगामुळे सापडतो म्हणून रोज योग करावा असे त्यांनी सांगितले.
सुबोध तिवारी यांनी कैवल्यधाम संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेतला. ममता बिष्ट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रणजित सिंग भोगल यांनी आभार मानले.