स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) ः
आजची चांगली बातमी आहे हिंगोल्यातून…
कुणाच्या पारड्यात नियती कसलं दान देईल सांगता येत नाही. मराठवाड्यातील हिंगोलीमधील एका शेतकरी कुटुंबातील मुलगा चक्क जगातील सर्वांत हुशार विद्यार्थी ठरला आहे. त्याची गिनीज बुक आॅफ रेकाॅर्ड्समध्ये निवडदेखील झाली आहे. आजच्या घडीला महिन्याला कोट्यवधींचे पॅकेज मिळवणारा युथ आयडाॅल म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते आहे. या युवकाचे नाव आहे आकाश पोपळघट.
हा विद्यार्थी सध्या चर्चेत आहे. अमेरिकेतील मॅसुचुसेस्टस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) या विद्यापीठात त्याची निवड झाली आहे. जगातील फक्त ४० विद्यार्थ्यांची यासाठी निवड झाली असून त्यात निवड झालेला हा एकमेव भारतीय विद्यार्थी आहे. येथून त्याने पीएचडी पदवी संपादन केली असून सध्या गुगल एआयमध्ये काम करून तो महिन्याला कोट्यवधी रुपयांचे पॅकेज घेत असल्याची माहिती त्याच्या लिंक्डइन प्रोफाईलला देण्यात आली आहे.
जिद्द आणि मेहनत असेल तर तुमच्यासमोर आकाशही ठेंगणे पडू शकते हे हिंगोलीच्या या शेतकरी पुत्राने करून दाखविले आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्यातील सेनगाव तालुक्यातील काकर येथील शेतकरी कुटुंबात आकाश लहानाचा मोठा झाला आहे.
काकर या खेडेगावात आकाशचे वडील गजानन पोपळघट हे व्यवसायाने शेतकरी आहेत. तर आई लक्ष्मी या गृहिणी आहेत. आकाश हा बालपणापासूनच अभ्यासामध्ये अव्वल होता. आकाशचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे माध्यमिक शिक्षण झाले. शिक्षण घेत असतानाच त्याला अवांतर वाचनाची गोडी लागली. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख’ या पुस्तकातून त्याने प्रेरणा घेतली. डी. एन. देशमुख व गिरी सर यांच्यामुळे वाचनाची आवड निर्माण झाली व त्यातूनच त्याच लिखाण सुधारले. दहावीला त्याने 99.04 इतके मार्क्स मिळवले. चौथी ते पाचवीपासून कलेक्टर व्हायचे स्वप्न त्याने पाहिले. परंतु पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व विठ्ठल लहाने यांनी त्याला मार्गदर्शन केले व नीट, जेईईच्या परीक्षा द्यायला लावल्या. त्यानंतर यूपीएससीकडे वळ असा सल्ला दिला. त्यामुळे त्यानंतर राजस्थानमधील कोटा येथे 11वी व 12 वी चे शिक्षण घेतले. येथे आकाशच्या ज्ञानकक्षेला आकाशही ठेंगणे पडू लागले. विविध अभ्यासक्रमांची माहिती त्याला येथे मिळाली. सेट आॅलंपियाड सारख्या अनेक स्पर्धा परीक्षा व जीईई मेन्स, अॅडव्हान्सची तयारी केली. एमआयटीला अर्ज करता येतो हे आकाशला समजले. रोज १८ तास अभ्यास करून या परीक्षेत आकाशने लक्षणीय यश मिळवले. त्यानंतर एमआयटीसाठी अर्ज केला त्याचीही परीक्षा उत्तीर्ण झाल्याने तो प्रवेशास पात्र ठरल्याचे पत्र मिळाले.
आकाश पोपळघट म्हणतो, संघर्ष, सातत्य व संयम ठेवत मी पुढे आलो आहे. आजवर मी 22 इंटरनॅशनल आॅलंपियाड दिल्या. त्यात 22 गोल्ड मेडल मिळवले आहेत. त्यातून मी सगळ्या जगाला समजलो आणि एमआयटीने माझी निवड केली. सुरेश भटांच्या ‘विझलो जरी आज मी’ या कवितेने मला नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा दिली.
आपल्या यशाविषयी आकाश म्हणतो, आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील समाधान हाच मोठा पुरस्कार असतो. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातला भारत बनवण्यासाठी मला योगदान द्यायचे आहे. एरोस्पेस व फिजिक्समध्ये संशोधन करायचे आहे. एखाद्या फिल्ड मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा त्यातील एव्हरेस्ट व्हायचा प्रयत्न करा. स्वप्न मोठी ठेवा. हार्ड वर्क करा, असाही मोलाचा सल्ला त्याने दिला आहे.