‘ते चार दिवस’ हा जिवंत देखावा वेधून घेतोय लक्ष
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून
गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी होणारी अलोट गर्दी लक्षात घेऊन त्यातून समाजप्रबोधनाचा वसा जपण्याचा प्रयत्न पुण्यातील काही मंडळे सातत्याने करीत आहेत. त्यातीलच एक म्हणजे संयुक्त मित्र मंडळ. या मंडळाने मासिक पाळी या न बोलण्याच्या विषयावर थेट बोलण्याचे धाडस केले आहे. ‘ते चार दिवस’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. त्याला लोकांची चांगली दाद मिळते आहे.
मासिक पाळी ही नैसर्गिक व जैविक असून तिच्याविषयी असणाऱ्या चुकीच्या श्रद्धा, रूढी, परंपरेला छेद देत या मंडळाने समाजपरिवर्तन करण्यात छोटासा प्रयत्न केला आहे. महिलांच्या आयुष्यात मासिक पाळी हा अतिशय संवेदनशील विषय आहे. या विषयावर अभावानेच जाहीरपणे वाच्यता केली जाते. 21व्या शतकातही समाजाची मानसिकता या विषयावर बोलू नये, कोणास काही कळू नये अशीच आहे. परंतु अशा संवेदशील विषयावर ‘ते चार दिवस’ या जीवंत देखाव्याच्या माध्यमातून मनोरंजन करत समाज प्रबोधन करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. संयुक्त मित्र मंडळ नागनाथ पार, सदाशिव पेठ येथील गणेश मंडळाने नृत्य, नाट्य, संगीताच्या सहाय्याने या जिवंत देखाव्याचे आयोजन केले आहे. हा देखावा नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे.
देखाव्याची संकल्पना, लेखन, नेपथ्य व दिग्दर्शन मंडळाचे सल्लागार पियूष शहा यांचे आहे. गणेश मंडळाच्या वय वर्षे 7 पासून 50 पर्यंतच्या आठ महिला कार्यकर्त्यांचा यात सहभाग असून पंधरा मिनिटांच्या जीवंत देखाव्यासह पोस्टर प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष निलेश पायगुडे यांनी दिली.
संत सोयराबाई रचित ‘देहासी विटाळ करती सकळ..’ या विटाळाविषयीच्या अभंगापासून आजच्या पिढीला भावेल अश्या साध्या-सोप्या रॅप संगीताचाही वापर देखाव्यात खुबीने करण्यात आला आहे.
महिलांच्या मासिक पाळीविषयीच्या कल्पना, विचार, वेदना, चुकीच्या संकल्पना असा आगळावेगळा विषय घेऊन गणेश मंडळ प्रथमच उत्सवाच्या काळात सादरीकरण करत आहे. कार्याध्यक्ष ऋषिकेश रिसबुड, उपाध्यक्ष जयंत बनकर, खजिनदार राजेश मारणे यांचे आयोजनात विशेष सहकार्य आहे.
याविषयी पियुष शाह म्हणाले, स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा परंतु अत्यंत दुर्लक्षित आणि चुकीच्या सामाजिक रुढी परंपरांमध्ये अडकलेला हा विषय आहे. या संवेदनशील विषयावरील जनजागृती उपक्रमातून योग्य ते समाजप्रबोधन घडेल आणि त्या चार दिवसात स्त्रीचे आयुष्य सुकर होईल, असा आमचा देखाव्यामागचा प्रयत्न आहे.
Parag dada, खूप खूप मनापासुन धन्यवाद