- हाती घेतले समृद्ध भारत अभियान
- शहर-गावांची शाश्वत रचना करण्यावर भर
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून
पुण्या-मुंबईसह देशातील छोटी, मोठी शहरे आणि खेड्यांची रचना शाश्वत करण्यावर भर देणारा जाहीरनामा विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींनी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून ‘समृद्ध भारत अभियाना’चा निर्धार केला आहे. ज्येष्ठ उद्योजक नितीन ढेपे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
यात सहभागी असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, डॉ. सदानंद बोरसे, वास्तुविशारद डॉ. अविनाश सोवनी, शिरीष केंभवी, बांधकाम व्यावसायिक एस.आर.कुलकर्णी, मिलिंद जोशी, दीपा देशमुख, डॉ,धनंजय केळकर, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, वसंत लिमये, ग्राहक पेठचे सूर्यकांत पाठक, पांडुरंग तावरे, पत्रकार संतोष देशपांडे, कलाक्षेत्रातील चारुहास पंडित, दिग्पाल लांजेकर माजी आयुक्त शेखर गायकवाड, पर्यटन क्षेत्रातील वसंत लिमये, या विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी संवाद साधला.
याबाबत माहिती देताना शहरीकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे सांगून शहरांच्या नियोजनाचे आराखडे आणि त्याची अंमलबजावणी योग्य वेळी आणि योग्य रीतीने न झाल्यामुळे शहरांची बेसुमार वाढ होत असल्याची माहिती यावेळी प्रसिद्ध उद्योजक नितीन ढेपे यांनी दिली.
शाळा, रस्ते, पाणी, मैदाने, दवाखाने या पायाभूत सुविधा तुटपुंज्या पडत
असल्याने शहरी जीवनमानाचा स्तर खालावत चालल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. याच जाणिवेतून त्यांनी ‘समृद्ध भारत अभियाना’च्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती दिली. भविष्यातील सुनियोजित गावे आणि शहरांसाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना जाहीरनामा पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी ढेपे यांनी दिली.
या समस्यांवर वेळीच उपाय न शोधल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. आजवर झालेल्या बेसुमार शहरवाढीची दाहकता कमी करून मोठी शहरे, छोटी शहरे तसेच गावांची रचना शाश्वत व्हावी, यासाठी उपाय आम्ही सुचवत असल्याचेदेखील ते म्हणाले. याचा एक जाहीरनामा आम्ही मुख्यमंत्र्यांना तसेच देशपातळीवरील सुधारणांचा जाहीरनामा पंतप्रधानांना पाठवीत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
‘हॅपिनेस इंडेक्स’ मध्ये भारत मागे का ?
ट्रॅफिक जॅम, प्रदूषण, पूरासारख्या समस्या गंभीर रूप धारण करत आहेत. शहरात होणाऱ्या केंद्रीकरणामुळे अनेक खेड्यांमधील सार्वजनिक जीवन दुर्लक्षित झाले त्यामुळे तेथील रहाणीमानही खालावत चालले असल्याचे सांगून ‘हॅपिनेस इंडेक्स’मध्ये भारत खूप मागे असल्याचे हे एक मोठे कारण आहे, असेदेखील यावेळी ‘समृद्ध भारत अभियाना’चे प्रणेते नितीन ढेपे म्हणाले.
‘समृद्ध भारत अभियाना’चा असा असेल प्रवास
‘समृद्ध भारत अभियाना’च्या पुढील प्रवासाविषयी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना मोठी शहरे, छोटी शहरे आणि खेड्यांची रचना अधिक चांगली आणि शाश्वत करण्यासाठीचा जाहीरनामा पाठविणे आणि त्याचा पाठपुरावा करणे, नगररचनेविषयी समाजात जागरूकता निर्माण होईल, यासाठी उपक्रम आयोजित करणे, त्यांचे पुनरुज्जीवन करणे याबाबत काटेकोरपणे लक्ष देण्यात येणार आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
जाहिरनामा काय सांगतो?
■ महाराष्ट्रातील शहरांसाठी लोकसंख्येची प्रतिचौरस किलोमीटरप्रमाणे घनता निश्चित करणे
■ लोकसंख्येची घनता ओलांडलेली असल्यास शहराच्या वाढीवर मर्यादा आणणे
■ त्या शहरालगत नवीन स्वयंपूर्ण गावे, शहरे निर्माण करणे
■ सध्या अस्तित्वात असलेल्या आणि नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या गावे-शहरांचा विकास आराखडा पुढील ५० वर्षांतील विस्ताराची शक्यता लक्षात घेऊन केला जाऊ शकतो का, याबाबत विचार करणे