स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे मुंबईतून…
पुस्तक म्हणजे ज्ञान…. पुस्तके म्हणजे विकासाची कवाडे उघडी करून देणारी संधी… पुस्तकासारखा मित्र नाही असंही म्हंटल जात.आज आपण अशाच पुस्तकवेड्या मित्राबद्दल जाणून घेणार आहोत जो दररोज एक पुस्तक वाचतो. “लॉकडाऊन नसताना मी दिवसाला एक पुस्तक वाचतो” अगदी सहज गप्पा मारता-मारता अमृत देशमुख हे आपल्याला सांगतो तेव्हा त्याला सलाम ठोकावासा वाटतो…..
मुंबईजवळच्या ठाण्यात राहणाऱ्या अमृत देशमुख हा दररोज एक पुस्तक वाचतो. त्याने ‘बुकलेट’ हे अॅप तयार केलंय. विविध भाषांमधील पुस्तकं वाचून अमृत त्यांचा लेखी आणि ऑडिओ सारांश या अॅपच्या माध्यमातून देतो. लोकांना जास्तीत जास्त वाचनासाठी प्रवृत्त करणं – ‘मेक इंडिया रीड’ हे आपलं ध्येय असल्याचं अमृत देशमुख सांगतो. त्यासाठीच त्याने ‘7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स’ हे पुस्तक लिहिलंय.आतापर्यंत 1,480 पुस्तकं त्याने वाचली आहेत.
लहानपणापासून अमृत देशमुख वाचनवेडा नव्हता. त्याच्या वाचनाचं श्रेय त्याच्या मोठ्या भावाला देत मी लहान असताना माझ्या वाढदिवसाला तो सगळ्यांना पुस्तकं भेट द्यायला सांगायचा असे अमृत देशमुख सांगतो. 10 वी झाल्यावर त्याच्या भावाने त्याला नॉन फिक्शन पुस्तकं वाचायला सांगितली.
“त्याने मला रॉबर्ट किओसाकींचं ‘रिच डॅड, पुअर डॅड’ हे पुस्तक दिलं. ते वाचल्यावर मला माझ्या पालकांचा, शिक्षकांचा खरंतर राग आला. कोणी आपल्याला इतकी महत्त्वाची गोष्ट का सांगितली नाही, असा प्रश्न मला पडला. तिथून पुढे मग मी वाचनाबद्दल गंभीर झालो.”
वाचनाची सवय कशी लावून घ्यायची?
लहान वयात ही सवय लागली नाही तर मग नंतर वाचनाची आवड आणि सवय रुजणं कठीण असल्याचंही अनेकांना वाटतं. पण अमृत देशमुख याबद्दल सांगतात, “हे सगळे माझेही प्रश्न होते. त्यावर मात करत मी वाचन करायला सुरुवात केली. पहिली सवय सांगतो. आपण जेव्हा टीव्ही बघतो, पिक्चर बघतो, तेव्हा मजा आली नाही, तर सहज चॅनल बदलतो. पण तेव्हा आपण तो सिनेमा अर्धवट सोडल्याबद्दल स्वतःला दोष देत नाही. मला हेच सांगायचंय…डोन्ट टेक रीडिंग टू सिरीयसली. याचं कारण habits are casual…आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या सवयी या नकळत घडणाऱ्या गोष्टी असतात. त्याला फार नियम नसतात. मी आणखी एक गोष्ट केली. माझी उत्सुकता जागृत ठेवायची जबाबदारी लेखकांवर टाकू लागलो. सिनेमा बघताना आपण तेच करतो. लेखकांचा अपमान करण्याचा माझा उद्देश्य नाही. कारण त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे.”
‘बुकलेट’ अॅपची सुरुवात कशी झाली?
पदवीने चार्टर्ड अकाऊंटंट असणारे अमृत देशमुख पूर्वी स्टॉक मार्केट क्षेत्रात होते. ते सोडून त्यांनी स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचे लागोपाठ 3 स्टार्टअप अयशस्वी ठरले. “यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो. मनात वाईटसाईट विचार यायला लागले. अशातच एक दिवस मित्र मला बाहुबली -1 सिनेमा पहायला घेऊन गेला. आम्ही 15 मिनिटं लवकर पोहोचलो. म्हणून मग मी तेव्हा वाचत असलेल्या ‘7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ या पुस्तकातल्या गोष्टी त्याला सांगू लागलो. त्या 7 सवयी मी त्याला अगदी थोडक्यात सांगितल्या. यावर तो म्हणाला, ‘तू ज्याप्रमाणे मला सांगितलंस, त्याने पुस्तक प्रत्यक्ष न वाचताच मला वाचल्यासारखं वाटलं,’ तिथून माझ्या डोक्यात ही चौथ्या स्टार्टअपची कल्पना आली आणि मी या अॅपवर काम सुरू केलं.”
आज या अॅपचे 17 लाख सबस्क्रायबर्स आहेत. वाचनासाठी सध्या खूप माध्यमं उपलब्ध झालेली आहेत. छापील पुस्तकं, ऑनलाईन वाचन, ई-बुक्स, ऑडिओ बुक्स असे विविध पर्याय आता उपलब्ध आहेत. पुस्तकं हे कल्पना, संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचवणारं माध्यम असतं आणि हे माध्यम काहीही असू शकतं. मग तुम्ही ते ऑडिओ बुक म्हणून ऐका किंवा माझे पुस्तकांचे सारांश ऐका किंवा व्हिडिओ पाहा. त्यामुळे माध्यम महत्त्वाचं नाही.”
वाचन कसं करायचं?
सतत वाजणारा फोन, बातम्या, नेटफ्लिक्स – यूट्यूब, सोशल मीडिया या सगळ्या गोष्टी अनेकांसाठी वाचनाच्या मार्गातला अडथळा ठरतात. किंवा बैठक मारून सलग वाचन करणं अनेकांना कठीण जातं वा शक्य नसतं. मग अशावेळी काय करायचं? यावर अमृत देशमुख काही सोपे उपाय सांगतात. ते म्हणतात, “मी देखील काही 4-5 तास बैठक मारून वाचन करत नाही, कारण आपला मेंदू त्यासाठी बनलेलाच नाही. आपण अर्ध्या तासापेक्षा जास्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. वाचनासाठी सगळ्यात मोठी गोष्ट मी केली, ती म्हणजे मोबाईलची नोटिफिकेशन्स बंद केली. वाचन करताना 25 ते 30 मिनिटं मोबाईल दुसरीकडे ठेवून मी फक्त वाचन करतो. खरंतर अगदी साधी गोष्ट आहे. तुमच्याकडे फेसबुकसाठी वेळ असेल, तर ‘बुक’साठी असेलच. आपण कशाला प्राधान्य द्यायचं ते फक्त ठरवायचं आहे.
“विविध प्रकारची पुस्तकं वाचून पहा. आपल्या घरात पुस्तकं असतात, पण ती सगळी आपण वाचलेली नसतात. तिथपासूनच सुरुवात करता येईल. एका पुस्तकातून दुसऱ्या पुस्तकाचा संदर्भ मिळतो. वाचलेलं जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे त्यावर चर्चा करणं किंवा त्यातली तुम्हाला भावलेली गोष्ट कोणाला तरी सांगणं.” हे केलं तरी ते पुरेसे असते असे तो म्हणतो.
अमृत देशमुख…..खूप भारी
ह्या सोशल मीडिया च्या काळात आपण एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे