- वाचनसंस्कृतीचे नाते केले दृढ
- पुण्याच्या आबासाहेब अत्रे प्रशालेतील अभिनव उपक्रम
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…
रक्षाबंधनाचा सण अगदी उत्साहात नुकताच सगळीकडे साजरा झाला. बहिणींनी भावाला प्रेमाने आणि विश्वासाने राखी बांधली आणि भावांनी त्यांच्या रक्षणासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत तिला ओवाळणी दिली. परस्परांतील नात्याचे हे बंध घट्ट होत असताना पुण्यातील आबासाहेब अत्रे प्रशालेत मात्र एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या शाळेतील विद्यार्थीनींनी चक्क पुस्तकांनाच राखी बांधली आणि वाचन संस्कृतीचे नाते दृढ केले.
वाचनसंस्कृतीचा प्रसार होण्याच्या दृष्टीने विविध प्रकारचे प्रयत्न केले जातात परंतु पुस्तकांना जपण्यासाठी आपण कटिबद्ध होण्याची भावना वेगळी ठरली आहे. या अभिनव उपक्रमाची संकल्पना मांडली आणि प्रत्यक्ष कार्यान्वित केली ती संदर्भ ग्रंथपाल व माहिती तज्ज्ञ प्रसाद भडसावळे यांनी. शाळेतील सर्वच शिक्षकांचे व मुख्याधकांनी ही संकल्पना उचलून धरली आणि ती सुंदर रीतीने शाळेत राबवली गेली. यात विद्यार्थीनीही उत्साहाने सहभागी झाल्या. सगळ्या मुलींनी पुस्तकांना राख्या बांधल्या आणि त्यांच्या रक्षणाची शपथ घेतली.
प्रातिनिधिक स्वरूपात शाळेच्या ‘बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षा’तील पुस्तकांना, पुस्तकाच्या झाडांना राखी बांधून पुस्तकांचे तेलापासून, पाण्यापासून, सुट्ट्या बांधणी पासून तसेच मूर्ख व्यक्तीपासून रक्षण करण्यास कटीबद्ध असल्याची भावना व्यक्त केली. याप्रसंगी विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्या पुस्तकांना बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला.
‘भारतात २१व्या शतकात जन्मलेल्या आम्ही स्वत:सोबतच इतरांचेही रक्षण करण्यास सक्षम आहोत. विविध क्षेत्रात सर्वोच्च पदावरील महिला आमच्या आदर्श आहेत. त्यामुळेच यंदाची राखी पौर्णिमा आम्ही आत्मनिर्भर होऊन इतरांनाही त्यासाठी प्रेरित करणार आहोत’ असा संकल्प आबासाहेब अत्रे दिन प्रशालेतील विद्यार्थिनींनी केला.