भीमाबाई जोंधळे यांच्या हॉटेलमधून मेन्यूसह मिळतो पुस्तकांचा खजिना
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे नाशिकहून
नाशिकच्या ओझर जवळ असलेल्या दहावा मैल येथे ७५ वर्षीय आजी भीमाबाई जोंधळे यांनी चहाच्या टपरीपासून वाचन चळवळीला सुरुवात केली. आज आजींच्या ‘रिलॅक्स कॉर्नर’ या हॉटेलमध्ये जेवणाच्या मेन्यूसह पुस्तकांचा खजिनाही सर्वांसाठी खुला केला गेला आहे.
वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळावी यासाठी अवघ्या पाचवी शिकलेल्या आजीबाईंनी आपल्या हॉटेलमध्ये दर्जेदार पुस्तकांचा खजिना सर्वांसाठी खुला केला आहे. हॉटेलमधील टेबलावर मेनू कार्ड ठेवण्याऐवजी विविध पुस्तकं ठेवली आहेत. संपूर्ण जग मोबाईलच्या विळख्यात सापडले असताना वाचनापासून दूर गेलेल्या पिढीला वाचनाची सवय रहावी यासाठी त्या हा अभिनव उपक्रम राबवित आहेत.
या हॉटेलमध्ये जेवणासोबतच मराठी, हिंदी, इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषेतील वेगवेगळ्या स्वरूपातील पुस्तकांचा आस्वादही मिळतो. त्यांच्याकडे हॉटेलमध्ये तब्बल पाच हजार पुस्तकं उपलब्ध आहेत. हॉटेलच्या भिंती नाशिक शहरातील धार्मिक स्थळं, वाचनालय यांच्या छायाचित्रांनी रेखाटलेली आहेत. तर काही भिंती या कवितांनी भरलेल्या आहेत. या हॉटेलमध्ये ज्ञानपीठ विजेत्या कुसुमाग्रजांची अक्षरबाग, विंदा करंदीकरांचा मृदगंध वाचनकट्टा, वि.स.खांडेकर यांच्या नावाने अमृतवेल पुस्तकदालन सुरू केले आहे. यासोबत कवितेची भिंत, नाशिक दर्शन, आजीची शिदोरी, ज्ञानाचे प्रकाशदिवे, चित्रमय प्रदर्शन अशा विविध संकल्पना राबविल्या आहेत. म्हणून हॉटेलमध्ये बसल्यावर ग्रंथालयात बसल्याचा भास होऊ लागतो.
आजीबाईंच्या हॉटेलमध्ये प्रत्येक टेबलावर चार ते पाच अशी विविध पुस्तकं असतात. त्यातील पुस्तक जर वाचनासाठी आवडलं नाही, तर उठून बाजूला लावलेल्या मांडणीतून, टेबलावरून आपल्याला हवं ते पुस्तक घेता येतं. हॉटेलमध्ये ठेवलेलं कुठलंही पुस्तक वाचण्यासाठी मूल्य आकारलं जात नाही. लोकांच्या कपाटात धूळ खात पडलेली पुस्तकंदेखील हॉटेलमध्ये आणून ठेवली आहेत. त्यामुळे दुर्मिळ असा पुस्तकांचा खजिना या हॉटेलमध्ये उपलब्ध आहे.
या अनोख्या पुस्तकांच्या हॉटेलला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली देखील भेटी देत आहेत. यावेळी मुलांना मराठी लेखक आणि वाचन चळवळीचे धडे दिले जातात.
याविषयी भीमाबाई जोंधळे म्हणतात, पुस्तक चळवळ झाली पाहिजे, वाचनाकडे जगाचं लक्ष राहिलं पाहिजे. त्यामुळे हॉटेलात पुस्तकं मांडून ठेवली आहेत.
भीमाबाई जोंधळे यांचे आतापर्यंत ९० हून अधिक सत्कार सन्मान झाले आहेत. त्यांच्या या कामाची दखल राज्य शासनानेही घेतली असून, त्यांना राज्य शासनाने मानाचा कविवर्य मंगेश पाडगावकर पुरस्कार, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार देऊन गौरविले आहे.