स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी नाशिकहून
नाशिकमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि ‘सोशल नेटवर्किंग फोरम’ चे संस्थापक प्रमोद गायकवाड यांनी आपल्या अविरत कार्यातून महाराष्ट्रातील आदिवासी आणि दुर्गम भागात मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली आहे. त्यांनी लोकसहभागातून 33 आदिवासी पाडे टँकरमुक्त तर केलेच पण त्याचबरोबर 1000 बालके कुपोषण मुक्तही केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सुरू केलेल्या एक गाव एक वाचनालय या उपक्रमामुळे 100 आदिवासी तरुणांना शासकीय नोकऱ्या मिळाल्या आहेत.

त्यांनी राबवलेल्या या विविध उपक्रमांमुळे हजारो कुटुंबांचे जीवन बदलले आहे. सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी शहरांमधील दानशूर व्यक्तींना थेट गरजू ग्रामीण भागाशी जोडून त्यांनी हा बदल घडवून आणला आहे.
प्रमोद गायकवाड यांच्या सोशल नेटवर्किंग फोरमने दुर्गम आणि डोंगराळ भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठे पाऊल उचलले. त्यांनी भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या सुमारे ३३ आदिवासी पाड्यांना आणि गावांना टँकरमुक्त केले आहे. जलसंधारण, विहिरींचे पुनरुज्जीवन आणि नळ योजनांच्या माध्यमातून ५०,००० पेक्षा जास्त लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले.
यानंतर त्यांनी आपला मोर्चा कुपोषित बालकांकडे वळविला. त्यांनी १,००० हून अधिक बालके कुपोषणमुक्त केली. आदिवासी भागातील माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी त्यांनी विशेष मोहिमा राबवल्या आहेत. त्यांच्या संस्थेने राबवलेल्या कुपोषण निर्मूलन कार्यक्रमांतर्गत १,००० पेक्षा जास्त बालकांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यांच्या या प्रभावी आरोग्य प्रारूपाची राष्ट्रीय पातळीवरही दखल घेण्यात आली आहे.
याचबरोबर ग्रामीण आणि आदिवासी भागातील तरुणांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी ‘एक गाव, एक वाचनालय’ ही मोहीम सुरू केली. ग्रामीण भागात त्यांनी तब्बल २७ अभ्यासिका आणि ग्रंथालये सुरू केली. या वाचनालयांमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून, योग्य मार्गदर्शन, शिस्त आणि अभ्यासाचे वातावरण मिळाल्यामुळे १०० पेक्षा जास्त ग्रामीण तरुणांनी शासकीय नोकऱ्या मिळवल्या आहेत. नुकतेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जातेगाव येथील ग्रंथालयातील ८ विद्यार्थ्यांची एकाच वेळी शासकीय सेवेत निवड झाली आहे.
प्रमोद गायकवाड यांच्या या अतुलनीय आणि दिशादर्शक सामाजिक कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘आदिवासी सेवक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.





