स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे आसामहून
कचरा आणि टाकाऊ पदार्थांचा योग्य वापर केला, तर त्यातूनही उपयुक्त आणि आकर्षक वस्तू तयार होऊ शकतात, हे आसाममधील एका बाप-लेकीने सिद्ध करून दाखवले आहे. हत्ती आणि गेंड्याच्या शेणापासून चक्क वह्या, डायऱ्या, कागदी पिशव्या, दिव्यांचे आच्छादन आणि विविध सजावटीच्या वस्तू तयार करण्याची अनोखी संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली आहे. निवृत्त इंजिनिअर महेश चंद्र बोरा आणि त्यांची मुलगी निशा बोरा यांनी सुरू केलेला ‘Elrhino’ हा पर्यावरणपूरक उपक्रम सध्या वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराची संधीही उपलब्ध होत आहे.
महेश चंद्र बोरा यांनी २०१४ मध्ये ‘इरहिनो’ या उपक्रमाची सुरुवात केली. राजस्थानमध्ये हत्तीच्या शेणापासून कागद तयार केला जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर आसाममध्येही असा प्रयोग करता येईल का, या विचारातून त्यांनी संशोधन आणि प्रयोग सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांतून हत्ती आणि गेंड्याच्या शेणापासून हस्तनिर्मित कागद तयार करण्याचा मार्ग खुला झाला. पुढे त्यांची मुलगी निशा बोरा यांनीही या कामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. कॉर्पोरेट क्षेत्रातील तब्बल १७ वर्षांची नोकरी सोडून त्यांनी वडिलांच्या व्यवसायात सक्रिय सहभाग घेतला आणि या उपक्रमाला पुढे नेण्यास सुरुवात केली.
या प्रक्रियेत सर्वप्रथम हत्ती आणि गेंड्याचे शेण गोळा करून त्याची स्वच्छता केली जाते. त्यानंतर त्यातील नैसर्गिक वनस्पतीजन्य तंतू वेगळे केले जातात. या तंतूंपासून लगदा तयार करून त्यात पुनर्वापर केलेला कागद आणि इतर वनस्पतीजन्य तंतू मिसळले जातात. त्यानंतर या मिश्रणापासून कागदाच्या शीट्स तयार केल्या जातात. या कागदाचा वापर करून विविध वस्तूंची निर्मिती केली जाते.
विशेष म्हणजे, या कागदापासून तयार होणाऱ्या वस्तूंमध्ये केवळ वह्या आणि डायऱ्यांचाच समावेश नाही, तर आकर्षक कागदी पिशव्या, बॅग, लॅम्पशेड्स आणि सजावटीच्या वस्तूही तयार केल्या जातात. त्यामुळे टाकाऊ समजल्या जाणाऱ्या पदार्थांना उपयुक्त स्वरूप मिळत आहे.
या उपक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक गावकऱ्यांचा सहभाग. त्यांच्याकडून शेण संकलित करून खरेदी केले जाते. त्यामुळे गावकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते, तर निर्मिती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या ग्रामीण कारागिरांना रोजगार उपलब्ध होतो. तसेच कागदनिर्मितीसाठी लाकडाच्या लगद्यावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होते.
निसर्गातील उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर, टाकाऊ पदार्थांचे पुनर्वापर आणि रोजगारनिर्मिती यांचा सुंदर संगम या उपक्रमात पाहायला मिळतो. वडील आणि मुलीने मिळून उभा केलेला हा व्यवसाय केवळ आर्थिक उपक्रम नसून पर्यावरण संवर्धनाचा एक प्रेरणादायी संदेशही देत आहे.





