स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे वॉशिंग्टनहून
भारतीय समाजसेविका आणि स्वयंरोजगार महिला संघटनेच्या (सेवा) नेत्या रीमा नानावटी यांना महिलांचे हक्क, आर्थिक सक्षमीकरण, शांतता आणि सुरक्षा या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल २०२६ चा प्रतिष्ठित ‘हिलरी रॉडम क्लिंटन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथील जॉर्जटाउन विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर विमेन, पीस अँड सिक्युरिटी’ येथे अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
रीमा नानावटी यांच्या नेतृत्वाखाली स्वयंरोजगार महिला संघटनेने (सेवा) मोठी प्रगती केली आहे. ही संघटना असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांच्या हक्कांसाठी कार्य करते. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या श्रमांना योग्य प्रतिष्ठा मिळवून देणे, हे या संघटनेच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
नानावटी यांनी कृषी, ऊर्जा, अन्नप्रक्रिया, कचरा पुनर्वापर आणि वस्त्रोद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांच्या मालकीचे उद्योग विकसित करण्यावर भर दिला आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली पुरवठा साखळ्या उभारून त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी नानावटी यांनी ‘सेवा’ च्या माध्यमातून अन्नसुरक्षा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाचा लाभ सुमारे दहा लाख कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे. महिलांना स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेची उपलब्धता करून देण्यासाठी त्यांनी ‘हरियाली’ या हरित ऊर्जा आणि उपजीविका उपक्रमाचे नेतृत्व केले. या उपक्रमामुळे महिलांच्या शाश्वत विकासाला चालना मिळत आहे.
संकटग्रस्त महिलांच्या पुनर्वसनासाठी योगदान
भूकंपामुळे प्रभावित झालेल्या ग्रामीण महिलांचे जीवन आणि उपजीविका पुन्हा उभारण्यासाठी नानावटी यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. तसेच अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांसारख्या संकटग्रस्त देशांतील महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याच्या पुनर्वसन कार्यक्रमांतही त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने २०१३ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ या देशातील चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.
महिलांचे हक्क, आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षित भविष्य यांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या रीमा नानावटी यांचा हा सन्मान भारतीय सामाजिक कार्यासाठी अभिमानास्पद ठरला आहे.





