स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे उत्तर प्रदेशहून
जिद्द, कल्पकता आणि संशोधनाची आवड असेल, तर प्रतिकूल परिस्थितीही यशाचा मार्ग रोखू शकत नाही, हे उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील १७ वर्षीय पूजा पाल हिने सिद्ध करून दाखवले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराची मुलगी असलेल्या पूजाने भंगारातील वस्तूंचा वापर करून अवघ्या तीन हजार रुपयांत धूळमुक्त थ्रेशरचे मॉडेल तयार केले. तिच्या या अभिनव संशोधनाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, जपानमधील प्रतिष्ठित साकुरा सायन्स कार्यक्रमासाठीही तिची निवड झाली. तिच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला नवी प्रेरणा मिळाली आहे.
पूजा आठवीत शिकत असताना तिच्या शाळेजवळील शेतात गव्हाची मळणी सुरू होती. थ्रेशरमधून मोठ्या प्रमाणात धूळ आणि भुसा हवेत उडत होता. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांनाही खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्याचे तिच्या लक्षात आले. या समस्येवर उपाय शोधण्याचा विचार तिने शिक्षक राजीव श्रीवास्तव यांच्याशी बोलून दाखवला. घरी आईला चाळणीने पीठ चाळताना पाहिल्यानंतर पूजाला थ्रेशरमध्ये जाळी बसवण्याची कल्पना सुचली. धूळ आणि भुसा वेगळा करण्यासाठी जाळी, छोटा पंखा आणि पाण्याची टाकी यांचा वापर करण्याचे तिने ठरवले. त्यातून धूळ हवेत पसरण्याऐवजी एका ठिकाणी जमा करणाऱ्या यंत्राचे मॉडेल साकारले.
घरातील पत्र्याचे तुकडे, लाकूड, जुनी जाळी, छोटा पंखा आणि पाण्याची टाकी अशा टाकाऊ वस्तूंचा वापर करून पूजाने हे मॉडेल तयार केले. विशेष म्हणजे, संपूर्ण यंत्रासाठी तिला केवळ तीन हजार रुपये खर्च आला. या यंत्रामुळे मळणीदरम्यान उडणारी धूळ नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते. जमा होणाऱ्या धुळीचा खतनिर्मितीसह इतर कामांसाठी उपयोग करण्याचीही शक्यता आहे.
पूजाच्या मॉडेलची भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाशी संबंधित ‘इन्स्पायर अवॉर्ड्स – मानक’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. त्यानंतर तिची जपानमधील ‘साकुरा सायन्स हायस्कूल प्रोग्राम’साठी निवड झाल्याची माहिती आहे. या माध्यमातून तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कल्पना मांडण्याची संधी मिळाली. पूजाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. तिच्या उपकरणाच्या पेटंटसंदर्भातील प्रक्रियाही सुरू असल्याचे सांगितले जाते.
घरात मूलभूत सुविधांचा अभाव आणि आर्थिक अडचणी असतानाही पूजाने हार मानली नाही. तिचे यश हे केवळ एका यंत्राच्या निर्मितीपुरते मर्यादित नसून, ग्रामीण भारतातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मुलींच्या क्षमतेचे प्रतीक आहे. पुढील शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याबरोबरच गावातील गरजू मुलांनाही मदत करण्याची तिची इच्छा आहे. पूजाची ही प्रेरणादायी वाटचाल अनेक विद्यार्थ्यांना नवनिर्मितीची प्रेरणा देणारी ठरत आहे.





