स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून
लहान मुलांना डॉक्टरांकडे जाण्याची आणि इंजेक्शन घेण्याची भीती वाटणे स्वाभाविक आहे. त्यातच आयुष्यभर इन्सुलिन घ्यावे लागणाऱ्या टाइप-१ मधुमेहाचे निदान झाल्यास मुलांसह पालकांनाही मोठ्या मानसिक आव्हानाला सामोरे जावे लागते. मात्र, ही भीती दूर करून उपचारांचा प्रवास आनंददायी करण्याचा अभिनव प्रयत्न पुण्यात करण्यात आला आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुराधा खाडिलकर आणि डॉ. वामन खाडिलकर यांनी सुरू केलेल्या ‘स्वीटलिंग्ज सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये चिमुकल्यांना खेळता-खेळता मधुमेहावरील उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या या केंद्रात ८५० हून अधिक टाइप-१ मधुमेही मुलांची सर्वंकष काळजी घेतली जात आहे.
१४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन आणि बालदिनाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांमधील मधुमेहाचा वाढता प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या अंदाजानुसार, २०५० पर्यंत जगभरातील मधुमेहग्रस्त प्रौढांची संख्या ८५ कोटी ३० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
विशेषतः लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमधील टाइप-१ मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. भारतात २० वर्षांखालील सुमारे तीन लाख एक हजार मुले आणि किशोरवयीन मुले या आजाराने ग्रस्त असून, जगातील हा सर्वाधिक आकडा असल्याचे सांगितले जाते.
लहान मुलांना रुग्णालयातील वातावरणाची भीती वाटू नये आणि उपचारांचा ताण जाणवू नये, यासाठी स्वीटलिंग्ज सेंटरमध्ये विशेष गेमिंग झोन आणि विविध खेळांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे मुले खेळण्याचा आनंद घेतात आणि त्याचवेळी आवश्यक वैद्यकीय उपचारही घेतात. त्यामुळे उपचारांबाबत त्यांच्या मनात निर्माण होणारी भीती कमी करण्यास मदत होते.
या केंद्राचे वैशिष्ट्य केवळ वैद्यकीय उपचारांपुरते मर्यादित नाही. मुलांना योग्य आहार कसा घ्यावा, मधुमेहाचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच पालकांना मधुमेहाविषयी आवश्यक माहिती देऊन मुलांना मानसिक आणि सामाजिक आधारही उपलब्ध करून दिला जातो.
याबाबत डॉ. अनुराधा खाडिलकर यांनी सांगितले की, लहान मुलांमधील मधुमेहाबाबत अपेक्षित प्रमाणात जनजागृती झालेली नाही. भारतात टाइप-१ मधुमेह असलेल्या मुलांची संख्या तीन लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते; मात्र अनेक मुलांचे निदान होत नसल्याने प्रत्यक्ष संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. अनेकदा निदान झाल्यानंतरही इन्सुलिन उपलब्ध होण्यात अडचणी येतात.
टाइप-१ मधुमेहामध्ये शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करते. त्यामुळे शरीरात इन्सुलिनची निर्मिती अत्यल्प होते किंवा पूर्णपणे थांबते. हा आजार जीवनशैलीतील बदलांमुळे टाळता येत नाही. त्यामुळे रुग्णांना नियमितपणे आणि आयुष्यभर इन्सुलिन घेणे आवश्यक असते.
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
अतितहान लागणे, वारंवार लघवी होणे, विनाकारण वजन कमी होणे आणि सतत थकवा जाणवणे ही मधुमेहाची प्रमुख लक्षणे आहेत.
लहान मुलांमध्ये पूर्वी बंद झालेले अंथरूण पुन्हा ओले करणे, भूक वाढणे, अशक्तपणा आणि हालचाली कमी होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
लहान मुलांना मधुमेहासोबत जगताना केवळ औषधोपचार नव्हे, तर कुटुंबीयांचे प्रेम, योग्य मार्गदर्शन आणि सामाजिक आधाराचीही गरज असते. पुण्यातील स्वीटलिंग्ज सेंटरचा उपक्रम या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, उपचारांचा प्रवास भीतीचा नव्हे तर आत्मविश्वासाचा आणि आनंदाचा व्हावा, हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.




