युवकच घडवतील उद्याचे भविष्य – कॅप्टन आशिष दामले
पुणे (प्रतिनिधी) : समाजात परिवर्तन व्हावे, समाजात चांगले बदल व्हावे म्हणून सर्वांनी एकत्र येणे आज गरजेचे झाले आहे. भविष्य घडवण्याची जबाबदारी युवकांची आहे, तेच उद्याचे भविष्य घडवतील, असा आशावाद परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केले.
परिवर्तन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा परिषद ५.० चे उद्घाटन आज झाले. या वेळी व्यासपीठावर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, ग्यान की आणि रुरल रिलेशन्सचे अध्यक्ष प्रदीप लोखंडे, परिवर्तन संस्थेचे विश्वस्त समीर जाधवराव, ज्येष्ठ पत्रकार पराग पोतदार, परिवर्तनच्या प्रतिनिधी स्वाती मते आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी कॅप्टन दामले पुढे म्हणाले, आजची तरुणाई जाती पातीच्या पलीकडे जाऊन विचार करणारी आहे. नव्या दृष्टिकोनातूनच परिवर्तन घडू शकते. त्यासाठी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आपण सर्वजण सामाजिक चळवळींशी जोडले जाणे आवश्यक आहे. समाजात परिवर्तन व्हावे, समाज बदलावा यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.
प्रमोद रावत म्हणाले, आपल्या तरुण वयात एकही क्षण वाया न घालवता आपल्या आवडीचे काम करण्यात रमावे हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आपण जे काम करू त्यात आनंद मिळाला पाहिजे. आपण ज्या विषयात एकरुप होऊन काम केले तर अपयश कधीही येणार नाही. भविष्याच्या ताणात जगण्याऐवजी आहे तो क्षण आनंदाने जगता येणे महत्त्वाचे आहे. आपल्या प्रगतीला रोखणारे आपणच असतो हे लक्षात घेऊन जीवनाला युवकांनी आकार देणे आवश्यक आहे,
प्रदीप लोखंडे म्हणाले, समाजजीवन झपाट्याने बदलते आहे हे लक्षात घेऊन आपण ते स्वीकारून पुढे जायला हवे. आपण आपले उत्तरदायित्व न टाळता, अधिक जबाबदारीने, संयम व सातत्याची कास धरून यशाची वाट आखायला हवी. परिवर्तन सारखी संस्था युवा परिषदेच्या माध्यमातून युवकांसाठी करीत असलेले काम फार मोलाचे आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल कुलकर्णी यांनी केले. युवा परिषदेच्या आयोजनामागची भूमिका पराग पोतदार यांनी स्पष्ट केली. पाहुण्यांचे स्वागत पूनम ढगे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन जगताप यांनी केले.





