- जागतिक क्षितीजावर नेत्रदीपक कामगिरी
- कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाचा मानकरी
स्वदेस न्यूज:- (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे जाॅर्डनहून…
आदिवासी समाजातील साईनाथ पारधी याने १७ वर्षांखालील गटाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत ५१ किलो गटात कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने जाॅर्डन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत कझागिस्तानच्या मल्लाला धोबीपछाड दिले आणि कास्यपदकावर आपले नाव कोरले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर येऊन जागतिक क्षितीजावर आपली नोंद करणाऱ्या साईनाथचे सगळीकडून कौतुक होत आहे.
वाडा-मनोर या रस्त्यापासून पाच किलोमीटर दूर असलेल्या कोहोज या प्रसिद्ध किल्ल्याच्या पायथ्याशी गोऱ्हे हे छोटेसे गाव आहे. याच गावात साईनाथ पारधी राहतो. दिनांक १९ ते २५ ऑगस्ट दरम्यान अमान (जाॅर्डन) येथे जागतिक कुस्ती स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाच्या ग्रिकोरोमन विभागातून ५१ कीलो वजनगटात सहभागी झालेला पै. साईनाथ पारधीची कास्यपदकासाठी लढत कझाकीस्तानच्या येरासी मुसान या कुस्तीगिरासोबत झाली. या लढतीत पै. साईनाथ पारधी याने कझाकीस्तानच्या येरासी मुसानचा 3 विरुध्द 1 या गुण फरकाने मात करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
साईनाथचे यश स्वप्नवतच आहे. त्याने सुरुवातीस भाईंदर येथील गणेश आखाडा कुस्ती केंद्रात प्रशिक्षण घेतले होते. त्याच वेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी महाराष्ट्रातील कुस्तीगिरांनी ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवावे, या उद्देशातून ‘मिशन ऑलिंपिक’ ही योजना सुरू केली. या योजनेतील कुस्तीगिरांची निवड करण्यासाठी २०२१च्या जानेवारीत पुण्यातील जाणता राजा कुस्ती केंद्रावर राज्यातील १५ वर्षांखालील कुस्तीगिरांसाठी निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यात १६६ कुस्तीगिरांनी सहभाग घेतला होता. त्यातून १० कुस्तीगिरांची निवड झाली. निवडलेल्या कुस्तीगिरांचा सर्व खर्च ‘ड्रीम फाउंडेशन जाणता राजा कुस्ती केंद्र’तर्फे करण्यात आला.
निवड चाचणीतून साईनाथची ४२ किलो फ्रीस्टाईल विभागात निवड झाली होती. मात्र, त्याचा सुमारे एका वर्षाचा सराव पाहून त्यास ग्रिको रोमनमध्ये खेळवण्याचा निर्णय झाला. तेव्हापासून त्याचा ग्रिको रोमनचा सराव सुरू झाला. २०२४ मध्ये साईनाथने आपला कुस्तीचा दमखम दाखवत १५ वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवले त्यापाठोपाठ झालेल्या १७ वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पदकाची कमाई केली. जुन २०२४ मध्ये थायलंड येथे १५ वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा झाली त्या स्पर्धेत सुध्दा साईनाथने भारताच्या वतीने प्रतिनिधित्व केले होते.. सध्या जाणता राजा कुस्ती केंद्र, लोणीकंद येथे साईनाथ पारधी हा कुस्तीचा सराव करत असुन त्यास पै. संदीप भोंडवे, एन.आय.एस कुस्ती कोच सुरज तोमर व संतोष यादव हे कुस्ती प्रशिक्षण देत आहेत.