* माणदेशी कन्येची गरूडभरारी
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे साताराहून
ऊस तोड कामगार म्हंटले की या फडावरून त्या फडावर. या ऊसतोड कामगारांच्या मुलांचेही आयुष्य असेच फरफटते. या मुलांची वयाच्या अगोदर लग्न होतात आणि त्यांना संसारासाठी ऊसांच्या फडातील फेऱ्यात अडकवले जाते. मात्र एक मुलगी अशी आहे की जिने अशा जगण्याला फाटा दिला आहे. तिने आपल्या जिद्दीने एक इतिहासच घडवला, ती कन्या म्हणजे सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील काजल आटपाडकर. दुष्काळावर मात करत केलेल्या कष्टाचे चीज करत या माणदेशी कन्येनी भारताच्या हॉकी संघात स्थान मिळविले आहे. तिच्या या गरुडझेपेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणजे माण तालूका. याच माण तालूक्यातील वरकुटे-मलवडी गावाजवळील माळरानात असलेली पाटूलकीची वाडी. गावात जेमतेम घरे. नजर जाईल इतकी प्रत्येकाची जमिन, मात्र पावसापाण्यामुळ या जमिनीवर धड कुसळही व्यवस्थित उगवत नाहीत. याच दगड धोंड्यांच्या गावातली काजल आटपाडकर. ही सात भावंड. आई वडील ऊसतोड कामगार म्हणून या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात भटकंती असायची. घराला टाळ ठोकून या गावातून त्या गावातला त्यांचा प्रवास सुरु असायचा.
या भावंडामधील काजल ही पाचवी मुलगी. या मुलीची बालपणातली चपळाई आणि हुशारी चंद्रकांत जाधव आणि संगीता जाधव या शिक्षक दांपत्यांनी ओळखली आणि त्यांनी काजलला आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. शिक्षणातील प्राविण्य दिसता दिसता तिच्या शरिरातील चपळाई या शिक्षकांनी हेरली. तिला विविध स्पर्धात सहभागी करुन घेतले…गाव पातळीवरच्या स्पर्धा जिंकता जिंकता, ती तालूका- शहर आणि जिल्हा पातळीवरच्या स्पर्धांमधून पुढे येत गेली. अखेर तिने हॉकीची निवड केली.
हॉकीतील उत्कृष्ट खेळामुळे तिची भारताच्या टिममध्ये निवड झाली. तिच्या सहभागाने काजलचे आई वडिल भारावलेत. काजलच्या आई वडिलांचे शिक्षण झाले नाही. लिहिता वाचताही येत नाही. त्यामुळे या खेळाची पुसटशी कल्पनाही त्यांना नाही. फक्त मुलगी कोणता तरी खेळात काहीतरी चांगलं करते आहे एवढंच त्यांना माहित आहे.
काजलच्या या यशामागे शिक्षक दांपत्य असल्याचे तिचे आई वडिल सांगतात. गावापासून काही अंतरावर असलेल्या शाळेतल्या शिक्षकांनी तिचे भवितव्य घडवले. सध्या काजल भारताच्या हॉकी संघातील कोअर टिममध्ये आहे. ती लवकरच आता भारताच्या टिममधून खेळताना दिसेल. तिचे ध्येय याच दुष्काळाच्या मातीतून खेळात नाव लौकीक मिळवलेल्या धावपट्टू ललिता बाबर, आर्चरी जाधव यांच्या सारखा आपला झेंडा फडकवायचा असे आहे.