पुस्तक रुपी दहीहंडीने साजरा केला कान्हाचा वाढदिवस
स्वदेस न्यूज:- (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…
तिरंग्याच्या माळात नटलेला दोरखंड… त्यालाच हातात हात घालत उभारलेली पुस्तके आणि कारगिल शहीद वीरांचे फोटो… तरुणांच्या चेहऱ्यावर तिरंगा… ढोल ताशांच्या गजरात दुमदुमलेला परिसर… मच गया शोर सारी नगरी मे सारख्या गीतांनी प्रत्येकाच्या अंगात संचारलेला कान्हा…अन् रंग दे बसंतीवर चिमुकल्यांनी धरलेला ठेका अशा आनंदमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात अभिनव पुस्तक दहीहंडी एस पी कॉलेजमध्ये जल्लोषात साजरी झाली… आणि पुस्तकांच्या रुपात मुलांना कान्हा भेटला..!
वंदे मातरम संघटना, युवा फिनिक्स सोसायटी व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव पुस्तक दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. कारगील विजयाला 25 वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यातील शहीद वीरांना आगळीवेगळी ‘शब्दांजली’ या उपक्रमाने वाहण्यात आली.
ही पुस्तक रुपी दहीहंडी ज्ञानदीप बालक आश्रमातल्या लहान मुलांनी मल्लखांब, मानवी मनोरे सादर करून फोडली.
यावेळी युवा वाद्य ढोल ताशांच्या पथकाने उपस्थितांची मने जिंकली. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाचे यंदाचे 20 वे वर्ष आहे. 100 पुस्तकापासून सुरू झालेला हा उपक्रम आज 5000 पुस्तकांपर्यंत येऊन ठेपला आहे. या उपक्रमाद्वारे ही पुस्तके महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात पाठविण्यात येणार आहेत. स्पीकरच्या भिंतींना विरोध म्हणून या पुस्तकाच्या भिंती उभारायच्या या संकल्पनेला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अशी दहीहंडी महाराष्ट्रातली अजून नऊ ठिकाणी उभारण्यात येणार आहे यात जेजुरी, फलटण, नाशिक, कोकण, औरंगाबाद, जळगाव यांचा समावेश असेल, अशी माहिती वंदे मातरमचे प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ यांनी दिली.
मोबाईलच्या जगात वाचन संस्कृती रुजावी, मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून यात वेगवेगळ्या पुस्तक प्रकाशक देखील सहभागी झाले आहेत. त्यात प्रामुख्याने डायमंड, न्यू एरा, शुभम गोयल यांचा समावेश आहे. यात ऐतिहासिक, व्यक्तिमत्व विकास, आर्थिक साक्षरता मॅनेजमेंट इत्यादी प्रकारची पुस्तके मुलांना वाचायला मिळणार आहेत. अशी माहिती आयोजक गणेश देशपांडे यांनी यावेळी दिली.