स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून
वंदे मातरम् संघटनेतर्फे आणि युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्टच्या सहकार्याने देण्यात येणाऱ्या देशभक्ती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. आध्यात्मिक गुरू डाॅ. संप्रसाद विनोद यांना जीवनगौरव तर अॅड एस. के. जैन यांना शिक्षणगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष अमोल जगताप, शहर समन्वयक महेश बाटले, शहर कार्याध्यक्ष मोहित काकडे आदी उपस्थित होते.
यंदाच्या वर्षापासून संघटनेतर्फे राजकीय गौरव पुरस्कार सुरू करण्यात आला असून तो राजेश पांडे यांना जाहीर झाला आहे. तसेच, महेंद्र चव्हाण यांना क्रीडा गौरव, डॉ. अभिजित सोनवणे यांना सामाजिक गौरव, गजेंद्र पवार यांना उद्योजकता गौरव आणि मंदार गोंजारी यांना पत्रकारिता गौरव पुरस्कार जाहीर झाल्याचे जामगे यांनी सांगितले.
पुरस्कारांचे वितरण दिनांक २३ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता टिळक रस्त्यावरील उद्यान प्रसाद कार्यालयात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी आमदार हेमंत रासणे, पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल आदी उपस्थित राहणार आहेत.